भाजपसोबत हातमिळवणी करुन संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असले तरी या निर्णयामुळे जदयूत मोठी फूट पडली आहे. जदयूचे माजी अध्यक्ष शरद यादव आणि खासदार अन्वर अली यांनी उघडपणे नितीशकुमार यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. माझा अंतरात्मा नितीशकुमार यांच्या निर्णयाला पाठिंबा देऊ शकत नाही असे जदयूचे खासदार अन्वर अली यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवरील भ्रष्टाचारांच्या आरोपांचे ओझे भिरकावून देत नितीशकुमार यांनी बुधवारी संध्याकाळी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपची साथ घेऊन नितीशकुमार गुरुवारी पुन्हा मुख्यमंत्री विराजमान झाले. मात्र नितीशकुमारांच्या निर्णयामुळे जदयूत फूट पडली आहे. जदयूचे माजी अध्यक्ष आणि राज्यसभेतील खासदार शरद यादव हे नितीशकुमार यांच्या निर्णयावर नाराज आहेत. नितीशकुमार यांच्या शपथविधी सोहळ्याकडे शरद यादव यांनी पाठ फिरवली. सध्या शरद यादव यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली नाही. पण त्यांचे मौन  आणि शपथविधी सोहळ्यातील गैरहजेरी यामुळे मतभेदांची चर्चा रंगली आहे. नितीशकुमार यांनी ‘राजद’शी काडीमोड घेतल्यावर भाजपसोबत जाण्याचा निर्णय घाईत घ्यायला नको हवा होता अशी शरद यादव यांची भूमिका असल्याचे सूत्रांकडून समजते.

शरद यादव यांनी राज्यसभेत आणि जाहीर सभांमध्ये भाजपवर टीकास्त्र सोडले असून आता भाजपशीच युती झाल्याने त्यांची कोंडी झाल्याचे समजते. तर जदयूचे खासदार अन्वर अली यांनीदेखील उघडपणे नितीशकुमार यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. नितीशकुमार यांनी त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून महाघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र माझा अंतरात्मा नितीशकुमार यांच्या निर्णयाला पाठिंबा देऊ शकत नाही असे सांगत अन्वर अलींनी नितीशकुमारांवर निशाणा साधला. गेल्या विधानसभा निवडणुकीत जदयूने विचारधारेमुळे भाजपशी फारकत घेतली होती. अजूनही दोन्ही पक्षांच्या विचारधारेत फरक असल्याचे त्यांनी नमूद केले.

२४३ आमदार असलेल्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी १२२ आमदारांची गरज आहे. राष्ट्रीय जनता दलाकडे ८०, संयुक्त जनता दलाकडे ७१, काँग्रेसकडे २७ तर भाजपप्रणित रालोआकडे ५८ आमदार आहेत. जदयू आणि एनडीए एकत्र आल्याने नितीशकुमार यांनी सहज बहुमताचा आकडा गाठला आहे.