दिल्लीत फटाके विक्रीवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर देशभरात फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादव यांचे पूत्र आणि ‘राजद’चे नेते तेज प्रताप यादव यांनी एक अनोखा उपाय सुचवला आहे. फटाक्यामुळे प्रदूषण होत असेल तर फुगे फुगवून ते फोडावेत. त्यामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, असे तेज प्रताप यादव यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके विक्रीवर बंदी घातली होती. आम्ही प्रदूषण टाळण्यासाठी फटाके विक्रीवर बंदी घातली, असे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात दिल्लीत प्रदूषणाची पातळी ‘खूप बिकट’ ते ‘गंभीर’ असल्याचे नमूद करण्यात आले होते. प्रशासनाने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार १५ मार्चपर्यंत शहरातील प्रदूषण गेल्यावर्षीच्या गंभीर पातळीपेक्षा कमी रहावे, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या होत्या.

तर महाराष्ट्रात पावसामुळे फटाका उद्योगाला २० कोटींचा फटका बसला होता. महाराष्ट्रातील सर्वात मोठा फटाका उद्योग तेरखेडा परिसरात विस्तारलेला आहे. मागील साडेतीन दशकापासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण उद्योगामुळे ‘छोटी शिवकाशी’ असे बिरुद तेरखेडय़ाला लागले आहे. शासन निकषाच्या अधीन राहून कमी आवाज आणि कमी प्रदूषण होणाऱ्या फटाक्यांचीच येथे निर्मिती केली जात असल्याचा दावा येथील उद्योजक करतात. साधारणत: येथेच विकसित झालेले ‘तेरखेडी तोटे’ हे वाण सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्याबरोबरच सुतळी बॉम्ब, फुलबाजे, मातीचे भुईनळे, रंगीत आकर्षक फटाके सण, उत्सव याबरोबर राजकीय कार्यक्रमांना लागणाऱ्या आदल्यांचे उत्पादन येथे मोठय़ा प्रमाणात केले जाते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तेरखेडा येथील फटाक्यांना लक्षणीय मागणी असते. तेरखेडय़ात सध्या फटाका निर्मितीचे एकूण १८ कारखाने आहेत. त्यात सुमारे पाचशेहून अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झालाय. या उद्योगातून दरवर्षी सुमारे दहा कोटीच्या घरात उलाढाल होते.यंदा पावसाने मुक्काम वाढविला. त्याचा फटाक्यांच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला. सतत पाऊस लागून राहिल्यामुळे फटाक्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती.