ग्राहकांच्या बचत खात्यावरील व्याज तिमाहीला त्यांच्या खात्यामध्ये जमा करावे, असा निर्देश रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मंगळवारी सर्व बॅंकांना दिले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी बचत खातेधारकांना फायदा होणार असून, तीन महिन्याला बचत खात्यावरील व्याज जमा होणार आहे. आतापर्यंत सहा महिन्याला बचत खात्यावरील व्याज ग्राहकाला दिले जात होते.
एक एप्रिल २०१० पासून आरबीआयने केलेल्या नियमांनुसार ग्राहकाच्या बचत खात्यावरील प्रत्येक दिवसाच्या शिलकीच्या आधारावर त्याला व्याज दिले जाते. हे एकत्रित व्याज तीन महिन्याला किंवा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये ग्राहकाच्या बचत खात्यामध्ये जमा करावे, असे निर्देश एका पत्रकाद्वारे सर्व बॅंकांना देण्यात आले आहेत. तीन मार्च रोजी हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. सामान्य ग्राहकांना सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका बचत खात्यावर ४ टक्के तर खासगी बॅंका सहा टक्क्यांपर्यंत व्याज देतात.