धडाकेबाज फलंदाजी आणि टीम इंडियासाठी खोऱ्याने धावा काढणारा अशी युवराज सिंहची ओळख आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही प्रचंड आहे. युवराज सिंह इतर खेळाडुंपेक्षा कसा ग्रेट आहे, हे पटवून देताना त्याचे चाहतेचही कधी थकताना दिसत नाही. या डावखुऱ्या फलंदाजाने चाहत्यांना कधी निराशही केले नाही. त्याने कधी आपल्या बॅटने तर कधी उत्कृष्ट गोलंदाजी करत टीम इंडियाला तर तारलेच शिवाय चाहत्यांनाही खुश ठेवले. सोशल मीडियावरही युवराजचे मोठे चाहते आहेत. इथेही त्याने विक्रम केला आहे. इन्स्टाग्रामवर युवराजने तब्बल ३० लाख फॉलोअर्सची संख्या पार केली आहे. त्यामुळे युवराज प्रचंड खुश झाला आहे. याचा एक व्हिडिओही त्याने शेअर केला असून तो त्यात हाताने इशारा करत ३० लाख फॉलोअर्स झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

टीम इंडिया सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये गेली आहे. युवराज सिंहही या टीमचा सदस्य आहे. टीम इंडियाने गतवर्षी ही मालिका जिंकली होती. या वेळीही चषक आपल्याकडे राखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावेळी महेंद्रसिंह धोनी कर्णधार होता.

युवराज सिंहने वर्ष २०००मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमधून केनियाविरूद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. पण या सामन्यात त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध त्याने ८४ धावा पटकावल्या होत्या. या मालिकेत भारत उपविजेता ठरला होता. अंतिम सामन्यात त्यांना न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाला २ सराव सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. एक सामना न्यूझीलंडविरोधात होता. हा सामना भारताने जिंकला. पण या सामन्यात युवराज हा ताप आल्याने खेळू शकला नाही. दुसरा सराव सामना बांगलादेशबरोबर होणार आहे.

बीसीसीआयनेही युवराजला ताप आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. काळजी करण्यासारखे कारण नसून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे बीसीसीआयमधील सूत्राने सांगितले.