इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमातींमधील लोक सर्वात भ्रष्ट असतात, असे बेलगाम वक्तव्य जयपूर साहित्यमेळ्याच्या प्रतिष्ठित व्यासपीठावरून शनिवारी करणारे लेखक आशीष नंदी यांच्यावर सर्वच स्तरांवरून टीका होत असून त्यांच्याविरोधात दोन गुन्हेही दाखल झाले आहेत.
जयपूर येथे एससी/एसटी राजस्थान मंचचे अध्यक्ष राजपाल मीना यांनी त्यांच्याविरोधात दंडसंहितेच्या कलम ५०६ (गुन्हेगारी हेतू) आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार नोंदविली आहे. तिची दखल घेऊन चौकशी सुरू केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
या कार्यक्रमात नंदी म्हणाले की, सर्वाधिक भ्रष्टाचारी हे अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय गटातील आहेत ही वस्तुस्थिती आहे. सर्वात कमी भ्रष्टाचार पश्चिम बंगालमध्ये आहे. तिथे माकपची आजवर सत्ता होती आणि त्या सत्तेच्या केंद्राजवळ या वर्गातील कुणीही पोहोचले नव्हते त्यामुळेच ते सर्वात कमी भ्रष्ट राज्य ठरले. नंदी यांच्या विधानाचा दूरचित्रवाहिनी पत्रकार आशुतोष यांनी तात्काळ प्रतिवाद केला. हे सर्वात घृणास्पद मत असून ब्राह्मण आणि उच्चवर्णियांनी भ्रष्टाचार केला तर तो नजरेआड होतो पण निम्न जातीतील कुणी तो केला की त्याचा गवगवा चालूच राहातो हे अत्यंत अयोग्य आहे, असे आशुतोष म्हणाले.
नंदी यांच्या विधानावर काँग्रेस, भाजप, संयुक्त जनता दल, कम्युनिस्ट पक्ष या सर्वानीच टीका केली. बहुजन समाज पक्षाच्या  मायावती यांनी तर त्यांना तात्काळ तुरुंगात टाकण्याची मागणी केली. लोकजनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान यांनीही त्यांच्यावर अत्याचारप्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करण्याची मागणी केली.
नंदी यांनी घाईघाईने निवेदन दिले असून आपल्या बोलण्याचा गैरअर्थ लावला गेल्याचा दावा केला व त्याबद्दल माफीही मागितली आहे. अर्थात आपण जे बोललो ते मनापासूनच होते. त्यामुळे त्याबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माझे बोलणे प्रत्यक्षात अल्पसंख्यक व पददलित समाजाचीच कड घेणारे होते. निम्न जातीतील लोक भ्रष्टाचार करतात तेव्हा त्यांना कारवाईत अडकवले जाते पण उच्चवर्णीय सहज सुटतात, असेच मी म्हणालो होतो. माझे आजवरचे आयुष्य वंचित वर्गासाठीच मी वेचले असून त्यात खंड पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी नंदी यांच्या वक्तव्याची छाननी करण्यासाठी चित्रफित मागितली आहे. पाच दिवसांचा जयपूर साहित्यमेळा सोमवारी संपत असून रविवारी सकाळी ‘हिंदी इंग्लिश भाई भाई’ या परिसंवादात नंदी यांचा सहभाग जाहीर झाला होता. प्रत्यक्षात नंदी यांनी या गदारोळाच्या पाश्र्वभूमीवर तडकाफडकी जयपूर सोडले आहे.
दरम्यान, नाशिकमध्येही समाधान जगताप यांनी नंदी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तत्पूर्वी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पोलीस ठाण्यात नंदींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले होते.