पासवान यांचा हल्लाबोल
बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवरून केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी सोमवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. बिहारमधील सध्याची स्थिती १९९०च्या दशकातील जंगलराजपेक्षाही अधिक भीषण आहे, असे पासवान म्हणाले.
बिहारमध्ये जंगलराज आले आहे किंबहुना त्याहून अधिक भीषण स्थिती आहे. सर्वसामान्य जनता सुरक्षित नसल्याने नितीशकुमार यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असेही पासवान यांनी म्हटले आहे.
बिहारमध्ये गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला असून नितीशकुमार स्वत:चीच पाठ थोपटून घेण्यात मश्गूल आहेत, असेही पासवान म्हणाले. लोकजनशक्ती पार्टीचे नेते ब्रिजनाती यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणीही पासवान यांनी केली.

तेजस्वी यांनी आरोप फेटाळले
उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये जंगलराज असल्याचा आरोप फेटाळला आहे. भाजप व लोकजनशक्ती यांनी राज्याची प्रतिमा मलिन करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.