उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्य़ात निवडणुकीचा जल्लोश साजरा होत असताना एक मुलगा ठार पावल्याच्या घटनेचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या वार्ताहरांना समाजवादी पक्षाचे आमदार नाहीद हसन यांनी ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे.
समाजवादी पक्षाच्या उमेदवार नफिसा यांचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत झालेला विजय पक्षाचे कार्यकर्ते कैराना भागात साजरा करत असताना, शेजारून एका रिक्षातून जात असलेला सामी नावाचा आठ वर्षांचा मुलगा गोळीबारात मारला गेला होता. या घटनेचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या दूरचित्रवाहिनीच्या दोन पत्रकारांवर नाहीद हसन व त्यांच्या समर्थकांनी हल्ला करून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. सत्ताधारी पक्षाची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगून हसन यांनी आधी हा आरोप नाकारला होता. या प्रकणाचा तपास गुरुवारी गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक विजय भूषण यांनी सांगितले. या घटनेच्या व्हिडीओ चित्रीकरणाच्या आधारे चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.