भारतीय संस्कृती आणि लष्करी सामर्थ्यांचं भव्य दर्शन आज राजपथावर जमीनीपासून आकाशात पहायला मिळाले. जगात सर्वांधिक विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीचे आणि लष्करी सामर्थ्याचे दर्शन येथे आज उपस्थितांचे आणि लाखो देशवासियांचे लक्ष वेधून घेत होते. यामध्ये स्थल, वायू आणि आकाश सेना, अर्धसैनिक बळ, पोलिस दल, एनसीसी कॅडेट्स आणि शाळेच्या विद्यार्थ्यांचे संचलन, ब्रहमोस आणिअग्नि-५ सहित अत्याधुनिक प्रौद्योगिकी पासून शस्त्रास्त्रे, विविध प्रदेश आणि मंत्रालयांचे रंगबेरंगी देखावे आणि लहान मुलांचे कार्यक्रम ६४व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे आकर्षण होते.
राजपथावर हा सोहळा पाहण्यासाठी दोन्ही बाजूला अतिशय उत्सुकतेने मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होती. थंडीचे दिवस असूनही नागरिकांच्या उत्साहाला उधाण आले होते. राजपथपासून लाल किल्ल्यापर्यंत आठ किलोमीटरच्या रस्त्यावर लहान मुले, प्रौढ आणि सामान्य नागरिकांची जत्रा भरली होती. राजपथावर प्रमुख सोहळ्याच्या ठिकाणी राष्ट्रपती प्रणब मुखर्जींनी तिरंगा फडकवला आणि राष्ट्रगीताच्या संगीतावर संचलनाला सुरूवात झाली. यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणूनचे भूटानचे राजे नरेश जिग्मे खेसर नांग्येन वांगचुक सलामी मंचावर उपस्थित होते.
डीआरडीओ द्वारे विकसित ५५०० पासून ५८०० किलोमीटर पर्यंत मारा करणारे बलास्टिक क्षेपणास्त्र अग्नि-५ यावर्षीच्या संचलनाचे सर्वांत मोठे आकर्षण होते. दिल्लीचे जनरल आफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल सुब्रोतो मित्रा यांनी लष्कर आणि पोलिस दलाच्या परेडचे नेतृत्व केले. दोन किलोमीटर लांबीच्या राजपथावर बॅन्डच्या तालावर अतिशय लयबध्द पध्दतीने लष्कर, अर्धसैनिक बळ आणि पोलिसांनी राष्ट्रपतींना सलामी दिली.
विशेष म्हणजे २०१२ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी आज पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला सलामी दिली.
उप राष्ट्रपति हामीद अंसारी, पंतप्रधान मनमोहन सिंग, सुरक्षा मंत्री ए के अॅंटनी, संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी, भाजपाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह सरकार मधील सर्व मंत्री, विविध देशांचे राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच भारतीय नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान कुठलीही अघटीत घटना घडू नये यासाठी पोलिस आणि अर्धसैनिक दलाच्या जवानांनी संपूर्ण दिल्लीमध्ये कडक सुव्यवस्था ठेवली होती. आकाशात हेलीकॉप्टरद्वारे नजर ठेवली जात होती आणि जमीनीवर महत्वपूर्ण ठिकाणं आणि संचलनाच्या मार्गावर उंच इमारतींवर शार्प शूटर तैनात करण्यात आले होते. जागोजागी सुरक्षा रक्षकांचा पहरा होता.