काश्मीर लागोपाठ दुसऱ्यादिवशी संचारबंदी मुक्त राहिले आहे. लोकांच्या हालचालींवरील र्निबध संपूर्ण खोऱ्यात उठवण्यात आले असून तेथील परिस्थिती सुधारल्याने हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, प्रतिबंधात्मक आदेश मात्र लागू असून त्यात लोकांना एकत्र जमण्यास मज्जाव आहे. काश्मीरमध्ये आज कुठेही संचारबंदी नव्हती, पण लोकांच्या एकत्र येण्यावर बंधने हा खबरदारीचा उपाय म्हणून चालू ठेवली आहेत असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. सुधारलेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला असून आता तेथील जनजीवन सुरळीत होत

आहे. बाजारपेठा काल दुपारी दोन नंतर खुल्या होत्या, कारण फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमध्ये दुपारी दोन नंतर सूट देण्यात आली होती.

फुटीरतावाद्यांच्या बंदमुळे दुकाने, पेट्रोल पंप व इतर व्यावसायिक आस्थापने आज बंद होती. सार्वजनिक वाहतूकही लागोपाठ ८० व्या दिवशी बंद होती. शाळा, महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्था बंद होत्या.

फुटीरतावादी गट हे काश्मीरमधील आताच्या संघर्षांचे नेतृत्व करीत असून ८ जुलैला हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वानी हा चकमकीत मारला गेल्यानंतर हिंसाचार सुरू झाला होता. दर आठवडय़ाला फुटीरतावादी गट निषेध कार्यक्रम करीत असून काही काळ बंदमधून सूट देत आहेत. आतापर्यंत हिंसाचारात दोन पोलिसांसह ८२ जण ठार झाले आहेत.