हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुऱ्हान वणी याला ठार मारल्यानंतर काश्मीर खो-यात अशांततेचे वातावरण आहे.  त्याच्या मृत्यूनंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून काश्मीर खो-यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु शनिवारी काश्मीरमधील चार जिल्ह्यांतील संचारबंदी उठवण्यात आली आहे. श्रीनगरमधल्या काही ठिकाणी लागू केलेली संचारबंदी देखील उठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. काश्मीर खो-यातील बंदिपोरा, बारामुल्ला, बडगम आणि गंदेरबल या चार जिल्ह्यातील संचारबंदी उठवण्यात आली आहे. या चारही जिल्ह्यातील तसेच श्रीनगरमधल्या काही ठिकाणची परिस्थिती ही नियंत्रणखाली असल्यामुळे संचारबंदी उठवण्यात आली असल्याची माहिती पोलीसांनी दिली. जरी संचारबंदी उठवली असली तरी जमावबंदी येथे कायम आहे. येथील परिस्थीती पुन्हा हाताबाहेर जाऊ नये म्हणून जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. संचारबंदी उठवल्यामुळे येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

वाचा : औषधाचा अपाय

पण कुलगाम, कुपवाडा, फुलवामा यासारख्या जिल्ह्यात तसेच आठ पोलीस चौकांच्या भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. येथील परिस्थिती अद्यापही नियंत्रणाखाली आली नाही. येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेल्याच आठवड्यात २००० अतिरिक्त जवानांना काश्मीर खो-यात पाचारण करण्यात आले होते. राज्यसभेत देखील काश्मीर हल्ल्याचे पडसाद उमटले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून उफाळलेल्या हिंसाचारामुळे येथील शाळा, महाविद्यालय देखील बंद करण्यात आले आहेत. तसेच अमरनाथ यात्रेवर देखील या हिंसाचाराचा परिणाम झाला होता. आतापर्यंत काश्मीर खो-यातील हिंसाचारात ४६ जणांचा मृत्यू झाला आहे  तर दोन हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह हे देखील श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. शनिवारी आणि रविवारी दोन दिवसांत ते येथील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांची बाजू समजून घेणार आहेत.

वाचा :  भुताचे घर!