सुरक्षारक्षक आणि निदर्शक यांच्यात गेल्या महिन्यांत झालेल्या चकमकीत जखमी झालेला एक युवक शनिवारी रुग्णालयात मरण पावल्याने काश्मीर खोऱ्यातील धुमश्चक्रीत मरण पावलेल्यांची संख्या आता ८३ झाली आहे.

दरम्यान, श्रीनगर शहरातील स्थितीत सुधारणा झाल्याने तेथील संचारबंदी उठविण्यात आली आहे. मात्र फुटीर गटांनी दिलेल्या बंदच्या हाकेमुळे सलग ८५ व्या दिवशी खोऱ्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. बडगाम जिल्ह्य़ातील चेक-ए-कवूसा येथे निदर्शक आणि सुरक्षारक्षक यांच्यात झालेल्या चकमकीत पॅलेट लागून जखमी झालेल्या मुझफ्फर अहमद पंडित हा युवक शनिवारी रुग्णालयात मरण पावला. काही दिवसांपूर्वी त्याला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले होते. मात्र त्याला गंभीर स्वरूपाची लागण झाल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

सज्जतेच्या आढाव्यासाठी लष्करप्रमुखांची सीमाभागाला भेट

उधमपूर, चंदीगड : भारतीय लष्कराच्या नियंत्रण रेषेपलीकडील सर्जिकल हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताच्या युद्धसज्जतेचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग यांनी शनिवारी उत्तर आणि पश्चिम कमांडला भेट दिली. या दोन्ही महत्त्वाच्या कमांडच्या प्रमुखांनी लष्करप्रमुखांना या भागातील सद्य:स्थिती, तसेच त्यांची एकूण तयारी आणि आणीबाणीकालीन योजनांची माहिती दिली.

सर्जिकल हल्ल्यांची योजना आखून ती अमलात आणणाऱ्या नॉर्दन कमांडच्या उधमपूर मुख्यालयात जनरल सिंग यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या फत्ते करणाऱ्या विशेष दलाच्या कमांडोंशी संवाद साधला. लीपा, तट्टापानी, केल व भिंबर येथील सात दहशतवादी तळ यशस्वीपणे उद्ध्वस्त करणारे अधिकारी व सैनिक यांचे त्यांनी वैयक्तिकरीत्या कौतुक केले.

कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी.एस. हुडा यांनी त्यांना या भागातील सुरक्षाविषयक स्थितीची माहिती दिली. वेस्टर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सुरिंदर सिंग यांनी लष्करप्रमुखांना परिचालनविषयक बाबींची माहिती दिल्याचे संरक्षण खात्याच्या प्रवक्त्याने चंदीगडमध्ये सांगितले.

जनरल सिंग यांनी वरिष्ठ फॉर्मेशन कमांडर्ससोबत संवाद साधून त्यांना पश्चिम सीमेवर आत्यंतिक दक्षता व खबरदारी बाळगण्याचे आग्रही निर्देश दिले, असेही हा प्रवक्ता म्हणाला. सर्जिकल हल्ले करण्याचा निर्णय १८ सप्टेंबरला उरीच्या लष्करी तळावरील हल्ल्यानंतर लगेच घेण्यात आला होता. पाकिस्तान या हल्ल्यांचे उट्टे काढू शकतो हे गृहीत धरून भारत आकस्मिक योजनांसह सज्ज आहे, असे सूत्रांनी सांगितले.