पाकिस्तानात चक्रीवादळाने वायव्य भागात मोठी हानी झाली असून ४५ ठार तर २०० जण जखमी झाले आहेत. त्यात मुलांचा समावेश मोठा आहे. वादळाने अनेक घरे, विजेचे खांब कोसळले.
खैबर-पख्तुनवाला व आजूबाजूच्या परिसराला वादळाचा तडाखा बसला त्यात इमारती व घरे कोसळली, विजेचे खांब कोसळले. वादळाचा वेग ताशी १२० किमी होता. वादळाबरोबरच पाऊसही झाला.
पाकिस्तानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशाच्या इतिहासात ही तिसरी मोठी नैसर्गिक दुर्घटना आहे. वादळ आता संपले असून जोरदार पाऊस सुरू आहे. पेशावरमध्ये ३१ तर चारसड्डा येथे नऊ जण ठार झाले.
 नौशेरा जिल्ह्य़ात पाच जण ठार झाले आहेत, असे प्रादेशिक माहितीमंत्री मुश्ताक अहमद घनी यांनी सांगितले. ३६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये २०० जण जखमी झाले असून एकूण जखमींमध्ये शंभर मुले आहेत. अनेक ठिकाणी घरांची छपरे कोसळली. वारे ताशी १२० किलोमीटर वेगाने वाहत असून १० पथके मदतकार्य करीत आहेत, त्यात पाकिस्तानी लष्कर आघाडीवर आहे. वादळग्रस्तांसाठी १ हजार तंबू, अन्नाची पाकिटे व इतर वस्तू पुरवण्यात आल्या आहेत.
१.३ कोटी रुपयांची तातडीची मदत मंजूर करण्यात आली आहे तर वेळ पडल्यास १० कोटी अतिरिक्त मंजूर केले जाणार आहेत. अनेक ठिकाणी वीज गेल्याने घरे अंधारात होती, दूरसंचार सेवा विस्कळीत झाली तर पायाभूत सुविधा व पिकांची हानी झाली आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे खैबर-पख्तुनवाला भागात आपत्कालीन स्थिती जाहीर करून रुग्णालयांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.