मोरा हे चक्रीवादळ बांगलादेशाच्या किनाऱ्यावर पोहोचले आहे. या वादळामुळे किनारपट्टीवरील हजारो लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या वादळामुळे पूर्व भारतातील किनारपट्टीही प्रभावीत होण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणात मदत अभियान राबवण्यात येत आहे. हवामान विभागाने दोन बंदरांना १० स्केलवरील सर्वोच्च स्तराचा इशारा दिला आहे. चितगाव आणि कॉक्स बाजार येथील बंदराला या वादळाचा तडाखा बसण्याचा मोठा धोका असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मोरा वादळ हे उत्तरेकडे सरकत असून उद्या सकाळी चितगाव आणि कॉक्स बाजार येथे पोहोचल्यानंतर मोठा धोका असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. वादळाबरोबर किनारपट्टीवर पाऊस आणि वाऱ्याचा वेगही अधिक असेल. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जिथे या वादळाचा तडाखा बसणार आहे, तिथे स्थानिक प्रशासन आणि स्वंयसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी लोकांना सुरक्षित स्थळी नेत आहेत. आज संध्याकाळपर्यंत सर्वांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुरक्षा दलांनाही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक बंदरांवरील जलवाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे.