टाटा उद्योग समुहाची धारक कंपनी असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन सायरस मिस्त्री यांची गच्छंती करण्यात आली आहे. अवघ्या ४२ व्या वर्षी अध्यक्षपदी विराजमान झालेल्या सायरस मिस्त्री यांना चार वर्षातच भारतातील सर्वात मोठ्या उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले हे बघून सर्वांनाच धक्का बसला आहे.
ट्रकपासून ते अगदी मीठ तयार करण्यापर्यंतच्या उद्योगात टाटासमूह सक्रीय आहेत. २०१२ मध्ये मिस्त्री यांची रतन टाटा यांच्याजागी वर्णी लागली होती. त्यावेळी कंपनीची उलाढाल ४०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते असे सांगितले जाते. मात्र गेल्या काही वर्षात टाटा कंपनीची वाटचाल मंदावली आणि शेवटी मिस्त्री यांना हटवण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला. मिस्त्री यांची टाटा समुहाच्या अध्यक्षपदापर्यंतच्या वाटचालीचा घेतलेला हा आढावा…

वडिलांकडून उद्योगाचे धडे
शांत, मितभाषी आणि अत्यंत हुशार व्यक्तीमत्त्व म्हणजे सायरस मिस्त्री. टाटा उद्योगसमूहाची धुरा सांभाळणारे ते सहावे अध्यक्ष तर टाटा आडनाव नसलेले दुसरे अध्यक्ष होते. टाटा समुहाशी त्यांचा संबंध आला तो वडिलांमुळे. पालनजी मिस्त्री हे सायरस मिस्त्री यांचे वडील. पालनजी शापूरजी मिस्त्री यांची कंपनी दीडशेहून अधिक वर्ष बांधकाम क्षेत्रात होती. टाटासन्समधील सर्वात जास्त भागभांडवल पालनजी मिस्त्री यांच्या कंपनीकडे आहेत. त्यांच्याकडून सायरस मिस्त्री यांना उद्योगाचा वारसा लाभला.

सायरस मिस्त्री यांचे शिक्षण
सायरस मिस्त्री यांनी लंडनच्या इम्पिरिअल महाविद्यालयातून पदवी घेतली असून लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापनशास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. शिक्षण झाल्यावर मिस्त्री हे  वडिलांच्या पालनजी कंपनीमध्ये १९९१ मध्ये संचालक म्हणून सामील झाले. तीन वर्षांमध्ये ते व्यवस्थापकीय संचालक बनले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने झपाट्याने यशाचे शिखर गाठले. व्यवसायाचे योग्य नियोजन करणे, संभाव्य धोके ओळखणे तसेच पायाभूत व्यवस्थेचा विकास करणे यावर त्यांनी नेहमीच भर दिला.
टाटासमुहात पदार्पण
सायरस मिस्त्री यांनी टाटा समुहात पदार्पण केल्यावर अल्प कालावधीतच त्यांना रतन टाटांचा विश्वास संपादन केला. २००६ पासून ते टाटासमुहात आहेत. मिस्त्री यांच्या कार्यपद्धतीने खुद्द टाटांनाही भूरळ पडली. त्यामुळेच ४२ व्या वर्षीच त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. पण गेल्या काही वर्षात चित्र बदलले. जागतिक स्तरावर टाटाला मोठा फटका बसला आहे. टाटा मोटर्स, टीसीएस आणि टाटा स्टील या तीन आघाडीच्या उद्योगांची पिछेहाट झाली आहे. यामुळेच सायरस मिस्त्री यांना हटवण्यात आले असावी अशी चर्चा रंगली आहे.