दादरीत जे काही घडले ती एक लहानशी घटना होती, असे वक्तव्य करून भाजप खासदार सत्यपाल सिंग यांनी मंगळवारी नव्या वादाला तोंड फोडले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांकडून भाजपवर टीकेचा भडीमार केला जात आहे. भाजपकडून सध्या जे काही ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत त्याची प्रचिती सिंग यांच्या विधानावरून येते, असा शब्दांत विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहेत.
दादरीसारख्या घटनांबद्दल बोलायचे झाले तर असे प्रसंग हाताळण्यासाठी आपल्या देशातील लोकशाही वातावरण पूर्णपणे सक्षम असल्याचे त्यांनी सिंग यांनी ‘सीएनएन-आयबीएन’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. मात्र, सरकारने देशातील मुस्लिम आणि इतर धर्मीयांच्या दुरावस्थेची दखल घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रवक्ते अजय कुमार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सिंग यांचे हे वक्तव्य म्हणजे भाजप देशात जे काही करू पाहत आहे, त्याचे प्रतिबिंब आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त असणाऱ्या सत्यपाल सिंग यांच्या वकव्यामुळे मी घाबरून गेलो आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजपकडून ध्रुवीकरणाचे प्रयत्न होत असल्याचे सिंग यांच्या विधानावरून स्पष्ट होत असल्याचे अजय कुमार यांनी म्हटले.
दादरी ही लहानशी घटना असेल तर आणखी कोणती मोठी घटना सिंग यांना अपेक्षित आहे, असा सवाल समाजवादी पक्षाच्या राजीव राव यांनी उपस्थित केला. या वक्तव्यासाठी सत्यपाल सिंग यांनी माफी मागितली पाहिजे. मुंबईसारख्या शहराचे माजी पोलीस आयुक्त असणाऱ्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे निराशाजनक असल्याचेही यावेळी राजीव राव यांनी सांगितले.