जम्मू-काश्मीरमध्ये शुक्रवारी रात्री हाडे गोठवून टाकणाऱ्या थंडीने विक्रमी तापमानाची नोंद केली. काल रात्री तापमानाचा पारा उणे ५.९ अंश इतका खालावला होता. तर, थंडीच्या या लाटेमुळे येथील शनिवारची सकाळही उणे १.५ इतक्या तापमानात उजाडली. यंदाच्या हिवाळी मोसमातील हे सर्वाधिक कमी तापमान आहे. तापमानाचा पारा खालावल्यामुळे श्रीनगर शहरातील सुप्रसिद्ध दाल सरोवर आणि पाण्याचे इतर साठे संपूर्णपणे गोठण्याच्या मार्गावर आहेत. दाल सरोवराच्या काही भागात एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाण्यासाठी स्थानिक लोक आपल्या शिकारा बोटींना बर्फ फोडून वाट करून देत आहेत. मात्र, या वातावरणामुळे येथील पर्यटकांमध्ये अतिश्य उत्साहाचे वातावरण आहे. सध्या रस्त्यांवर बर्फाचा थर झाल्यामुळे वाहनधारकांना काहीशा अडचणीला सामोरे जावे लागत आहे.