उत्तर प्रदेशातील मैनपुरीमध्ये गुरुवारी घडलेल्या एका घटनेत १५ रुपयांसाठी दुकानदाराने दलित दाम्पत्याची कुऱ्हाडीने हत्या केली. मैनपुरी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यांचे क्षेत्र आहे. या घटनेनंतर लखीमपूर गावात राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. अशोक मिश्रा असे अरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. एससी/एसटी कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत नट (४५) आणि ममता (४०) या मृत पती-पत्नीला पाच अपत्य असून त्यांनी मुलांना शेजाऱ्यांकडे ठेवले होते. भरतकडून आरोपी मिश्राला १५ रुपये येणे होते. ज्याची तो भरतकडे सतत मागणी करत असे. मजुरीचे काम करणारे मृत दाम्पत्य आरोपीच्या दुकानातून सामानाची खरेदी करत असे. ही घटना घडली त्या दिवशी हे दाम्पत्य तांदुळाच्या लागवडीचे काम करण्यासाठी जात होते. त्यांना आडवून मिश्राने १५ रुपयांची मागणी केली. आपल्याकडे पैसे नसल्याचे भरतने सांगताच मिश्राने कुऱ्हाडीने दोघांवर हल्ला केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दोघांचे शीर धडापासून वेगळे झाले होते. पुरुषावर नऊ, तर महिलेवर सात वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक देवरंजन वर्मा आणि उपजिल्हाधिकारी पी. सी. गुप्ता घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करत आहेत.