पंजाबमध्ये मद्यधूंद अवस्थेत असलेल्या तरुणांनी स्टेजवर नृत्य करणा-या तरुणींसोबत नाचू दिले नाही म्हणून त्यातील एका तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

भटिंडामध्ये व्याजावर पैसे देणा-या व्यक्तीच्या मुलाचे लग्न पार पडले. या लग्न सोहळ्यानिमित्त नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवला होता.  वरासोबत आलेली मित्रमंडळी मद्यधूंद अवस्थेत होती. यातील काही जणांना स्टेजवर नाचणा-या मुलींसोबत नाचायचे होते. पण त्यांना थांबवण्यात आले होते. यामुळे त्या तरुणांचा पारा चढला होता. संतापाच्या भरात यातील एका तरुणाने स्टेजच्या दिशेने गोळी झाडली. ही गोळी स्टेजवर नाचणा-या कुलविंदर कौर या तरुणीच्या डोक्यात लागली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पंजाब पोलिसांनी याप्रकरणी चौघा जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले असून यातील तीन आरोपींची ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले. तर कुलविंदर कौरच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.