आमचा देश महान क्रिकेटपटू आणि मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे अपहरण करण्याचा विचार करत आहे, असे विधान इंग्लंडचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी शनिवारी एका परिषदेत बोलताना केले. सचिनचे अपहरण करून इंग्लंडच्या क्रिकेट संघाला प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्याचाही विचार आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या इंग्लंडचा क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर असून, अद्याप संघाचा खेळ समाधानकारक झालेला नाही.

‘हिंदुस्तान टाइम्स’ लीडरशिप परिषदेत कॅमरून बोलत होते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ऐतिहासिक संबंध आणि सांस्कृतिक संबंधांबाबतही त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाच्या कामगिरीबाबतही ते बोलले. कसोटी मालिकेत इंग्लंड संघाची कामगिरी बघता, सचिन तेंडुलकरचे अपहरण करून त्याने आमच्या संघाला प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. भारताने या मालिकेत २ – ० अशी आघाडी घेतली आहे.

या परिषदेत कॅमरुन यांनी जीवनात लक्षात ठेवण्यासारख्या विशेष गोष्टीही उपस्थितांना सांगितल्या. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत कधीही गोल्फ खेळू नका. कारण त्यांच्याबरोबर तुम्ही कधीही जिंकू शकत नाही, असा सल्ला त्यांनी दिला. इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्यासोबत कधीही पार्टीला जाऊ नका आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ६० हजार लोक समोर बसले असताना कोणत्याही व्यासपीठावर जाऊ नका. कारण तुम्ही त्यांचे वक्तृत्व कौशल्य आणि लोकांमध्ये समरस होण्याची
पात्रता यांच्याशी कधीही स्पर्धा करू शकत नाही, असेही ते म्हणाले.