मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला ‘लष्कर-ए-तोयबा’चा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी अतिरेकी डेव्हिड हेडलीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष मोक्का कोर्टात साक्ष नोंदविण्यात आली. हेडलीने यावेळी २६/११ हल्ला प्रकरणाशी संबंधित अनेक गौप्यस्फोट केले.
पाकिस्तानातच दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण मिळाल्याची कबुली देत हाफिज सईद हाच लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या असून त्यानेच मुंबई हल्ल्याचे आदेश दिले, असा महत्त्वपूर्ण खुलासा हेडलीने केला. याशिवाय, हाफिज सईदच्या भाषणाने प्रभावित होऊनच २००२ साली ‘लष्कर-ए-तोयबा’मध्ये सामील झालो, असेही हेडलीने मान्य केले आहे. ‘आयएसआय’शी संबंधित अधिकारी लष्करात सामील असल्याचाही खुलासा त्याने केला आहे. हेडलीने केलेल्या खुलास्यानंतर पाकिस्तानचा मुंबईतील हल्ल्यातील सहभाग अधिक स्पष्ट असून, पाकिस्तानचा नापाक चेहरा जगासमोर आला आहे.

‘लष्कर-ए-तोयबा’चा अतिरेकी साजिद मीरच्या सांगण्यावरूनच मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याचीही कबुली हेडलीने दिली.  तसेच एकूण आठ वेळा भारतात येऊन गेल्याचेही त्याने सांगितले. २६/११ च्या आधीच मुंबईवर हल्ला होणार होता, पण दोन वेळा हल्ल्याचा कट फसला. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो अयशस्वी ठरल्याचाही महत्त्वपूर्ण खुलासा हेडलीने केल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

दरम्यान, हेडली सध्या अमेरिकेमध्ये २६/११ हल्ल्याबद्दल ३५ वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याला मुंबईतील खटल्यातील आरोपी करण्याऐवजी माफीचा साक्षीदार करण्यास सरकारी पक्षाने अनुमती दिली आहे. त्यानुसार त्याची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष नोंदविण्यात आली.

हेडलीने केलेले महत्त्वपूर्ण खुलासे-
* हाफिज सईद हाच लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या, तोच आदेश द्यायचा.
*
हाफिज सईदच्या भाषणाने प्रभावित होऊन लष्कर-ए-तोयबामध्ये सामील झालो.
* लष्कर-ए-तोयबाचा मी कट्टर समर्थक.
* २६/११ च्या आधीही मुंबईवर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, पण तो अयशस्वी ठरला. अखेर २६ नोव्हेंबरचा हल्ला यशस्वी ठरला.
* लष्कर-ए-तोयबाच्या साजिद मीरने मला मुंबई शहराचा एक व्हिडिओ बनवायला सांगितला होता.
* मी एकूण आठ वेळा भारतात आलो. सातवेळा पाकिस्तानातून आणि एकदा यूएईमधून.
* मुंबईवरील हल्ल्यानंतर ७ मार्च २००९ ला पुन्हा एकदा भारतात  येऊन गेलो.
* पाकिस्तानातच मिळवलं दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण, साजिद मीरने पासपोर्ट तयार करून दिला. पासपोर्टमधील सर्व माहिती खोटी
* अमेरिकी नावाने भारतात प्रवेश करायचा होता. म्हणून २००६ साली दाऊद गिलानी नावाचे मी डेव्हिड हेडली असे नामांतर केले. त्यानंतर पाकिस्तानला भेटी दिल्या.
* नाव बदलल्यानंतर पाकिस्तानात साजिद मीरची भेट झाली. त्यानेच मला भारतात प्रवेश मिळविण्यासाठीचा पासपोर्ट मिळवून दिला.