कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा विश्वासु सहकारी छोटा शकील १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर भारताला शरण येण्यास तयार होते. मात्र, महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नकार दिल्यामुळे ही योजना फिसकटल्याचा खळबळजनक गौफ्यस्फोट शनिवारी माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी केला. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हा दावा केला. १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद आणि छोटा शकील यांनी मी लंडनमध्ये असताना माझ्यासमोर तशाप्रकारचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भारतात आल्यानंतर पोलीसांकडून छळ होण्याची शक्यता लक्षात घेता आम्हाला आमच्या निवासस्थानी नजरकैदेत ठेवण्यात यावे, अशी त्या दोघांची मागणी होती. परंतु, तत्कालीन राज्य सरकारने अशाप्रकारची हमी देण्यास नकार दिल्याने ही सर्व योजना बारगळल्याचे जेठमलानी यांनी सांगितले.
याशिवाय, छोटा शकीलने एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आम्हाला १९९३च्या बॉम्बस्फोटांनंतर भारतात परतायचे असल्याचे सांगितले. स्वत: भाईने (दाऊद) याबद्दल राम जेठमलींना सांगितले होते. मात्र, तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी ‘गेम’ केला आणि आमची भारतात परतण्याची योजना रद्द झाल्याचे शकीलने म्हटले. याशिवाय, शकीलने दाऊदला भारतात परत आणण्याच्या सरकारी घोषणांचीही खिल्ली उडवली. प्रत्येकवेळी नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर ‘उसको (दाऊद) लेके आयेंगे… घुसके लेके आयेंगे…’ अशा घोषणा केल्या जात होत्या. मात्र, त्यांना हे इतके सोपे वाटत होते का, असा उपरोधिक सवाल शकीलने मुलाखतीदरम्यान उपस्थित केला. मात्र, आता दाऊदला भारतात परतण्याची इच्छा नसल्याचे शकीलने यावेळी सांगितले.