कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम गंभीर आजारी असून त्याला गँगरिनचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्याचा पाय कापावा लागणार असल्याचे वृत्त पाकिस्तानमधील माध्यमांनी दिले आहे. मात्र या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही.
दाऊदच्या पायाचा बराचसा भाग सडला आहे. दाऊदच्या पायातील गँगरीन गुडघ्यापर्यंत पोहोचले असून त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. हा आजार बरे होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे पाय कापण्याशिवाय गत्यंतर नाही‘, असे दाऊदवर उपचार करत असलेल्या डॉक्‍टरांचे म्हणणे असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे. मात्र याबाबत मुंबईसह दिल्लीतील गुप्तचर सूत्रांनी काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. तीन महिन्यांपूर्वी घरात फिरताना दाऊदच्या पायाला दुखापत झाली होती, अशी माहितीदेखील मिळत आहे.
दाऊदने वयाची साठी गाठली असून १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात दाऊद मुख्य आरोपी आहे. दाऊदने टायगर मेमन, याकूब मेमन व अन्य साथीदारांच्या मदतीने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले होते. या स्फोटांमध्ये जण २५७ ठार तर ७००पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. गेल्यावर्षी या प्रकरणातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली.