दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानात राहणारा दाऊदचा भाऊ आणि भारतामधील दाऊदचा गुंड यांच्यातील फोनवरील संभाषण मुंबई पोलिसांनी टिपले आहे. त्यातून दाऊदच्या कटाची माहिती पोलिसांना मिळाली. दाऊद आखत असलेल्या या कारस्थानाची माहिती मुंबई पोलिसांकडून केंद्र सरकारला देण्यात आली आहे.

भारतातील महत्त्वाच्या ठिकाणांवर दाऊदचे लोक सक्रीय असल्याचे फोनवरील संभाषणातून समोर आले आहे. २४ वर्षांनंतर मुंबईत पुन्हा साखळी बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असलेल्या दाऊदच्या गुंडांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. पाकिस्तानमधील दाऊदचा भाऊ आणि मुंबईतील दाऊदचा गुंड यांच्यातील फोन संभाषण पोलिसांनी टिपल्याचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.

दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या गँगचे भारतातील काही लोक मुंबईत साखळी बॉम्बस्फोट करण्याची योजना आखत आहेत. याबद्दलचे एक फोन संभाषण टिपण्यात मुंबई पोलिसांना यश आले. यामधून मुंबई पोलिसांना अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. २४ वर्षांपूर्वीसारखेच साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा दाऊदचा मानस आहे. दाऊदच्या या कटात सहभागी असलेल्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांसमोर असणार आहे. काही दिवसांपूर्वीच दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ इकबाल कासकरला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. खंडणी मागितल्याचा आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी इकबालला ताब्यात घेतले.

इकबालसोबत आणखी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. इकबालने एका विकासकाला धमकावून त्याच्याकडून ४ फ्लॅट घेतले होते. मात्र यानंतरही त्याने विकासकाकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे विकासकाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी इकबालला अटक केली. इकबालला १३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कासकरच्या दोन साथीदारांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.