राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य धार्मिक नेत्यांची हत्या घडवून भारतात जातीय तणाव पसरविण्यासाठी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने योजना आखल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. देशातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजप सरकार अस्थिर करण्यासाठी दाऊद टोळीकडून ही योजना आखण्यात आल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) सूत्रांकडून करण्यात आला आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या दैनिकाकडून यासंदर्भातील वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे. या प्रकरणी एनआयएने अहमदाबाद न्यायालयात दाऊद टोळीच्या दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. डी गँगने टोळीत समावेश केलेल्या नव्या सदस्यांना दारुच्या रिकाम्या बाटल्यांमधून पेट्रोल बॉम्ब फेकण्याच्या तसेच चर्चमध्ये जाळपोळ करण्याचे आदेश दिले होते.
याशिवाय, गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या जातीय दंगलीत सहभाग असलेल्या व अन्य कडव्या हिंदू नेत्यांना संपवा आणि त्या मोबदल्यात चांगला पैसा आणि दक्षिण आफ्रिकेत नोकरी मिळवा अशी आमिषेही दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीकडून दाखवली जात असल्याची माहिती आहे. गेल्यावर्षी गुजरातमधील भाजप नेते शिरीष बंगाली आणि भाजप युवा नेता प्रग्नेश मिस्त्री यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. भारतात जातीय तणाव निर्माण करण्यासाठी डी गँगने जावेद चिकनाच्या माध्यमातून भाजप, आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दलाच्या नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला होता. जावेद चिकनाने यासाठी हवालामार्गे दुबईतून गुजरातमध्य पैसा पाठवला होता. त्याने आपले संबंध वापरुन मुंबई आणि सूरतमधून बंदुकीचीही व्यवस्था केली होती. मिस्त्री आणि बंगालीची हत्या केल्यानंतर आरोपीला पाच लाख रुपये देण्यात आले असे ‘एनआयएने’ दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे.