पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जनार्दन द्विवेदी अडचणीत आले असतानाच, हा प्रश्न अद्याप संपुष्टात आलेला नाही, पक्षश्रेष्ठींसमोर तो अद्याप प्रलंबित आहे, असे पक्षाच्या वतीने शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले.
हा प्रश्न पक्षश्रेष्ठींसमोर प्रलंबित असून द्विवेदी यांच्याबाबत श्रेष्ठी जो निर्णय घेतील तो जाहीर केला जाईल, असे काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.
द्विवेदी यांनी पक्षश्रेष्ठींकडे याबाबत स्पष्टीकरण दिल्याने हा प्रश्न आता संपलेला आहे, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. सी. चाको यांनी केले त्याकडे माकन यांचे लक्ष वेधले असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
चाको यांना याबाबत पूर्ण माहिती नसण्याची शक्यता आहे, आपण जे सांगितले तोच काँग्रेसमध्ये अखेरचा शब्द आहे, असे पक्षाचे मुख्य प्रवक्ते अजय माकन म्हणाले. द्विवेदी यांनी गुरुवारी काँग्रेसच्या शिस्तभंग समितीचे प्रमुख ए. के. अ‍ॅण्टनी यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.