संसदेचे हिवाळी अधिवेशन संपण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना राज्यसभेचा हा आठवडा कोणत्याही कामकाजाविना मावळण्याची शक्यता आहे. धर्मातराच्या मुद्दय़ावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवेदनावर अडून बसलेल्या विरोधी पक्षांच्या आडमुठेपणामुळे राज्यसभेचा सलग चौथा दिवस वाया गेला. धर्मातराच्या मुद्दय़ावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन देण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव धुडकावून काँग्रेससह सगळ्याच विरोधी पक्षांनी एकजुटीने राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. आम्ही चर्चेला तयार आहोत, परंतु सरकारकडून कुणी निवेदन द्यावे, याची सूचना आम्हाला विरोधकांनी देऊ नये, अशा कठोर शब्दांत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांना सुनावले. त्यावर संतप्त झालेले सीपीआयएमचे सदस्य सीताराम येच्युरी यांनी, हा विषय अत्यंत महत्त्वाचा असल्याने त्यावर पंतप्रधानांनीच निवेदन द्यावे, अशी आग्रही मागणी केली. त्यास नकार देत गृहमंत्रीच निवेदन देतील, याचा पुनरुच्चार संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी केला. त्यामुळे झालेल्या गदारोळात दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले.