दिल्ली तसेच देशभरातील महिला व तरुणींना सुरक्षा प्रदान करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देताना बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याचा प्रस्ताव संसदेपुढे ठेवण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवारी दिवसभर झालेल्या आंदोलनानंतर शिंदे यांनी या आंदोलनातील सात प्रतिनिधींशी चर्चा केली व त्यांना कारवाईबाबत आश्वस्त केले. दिल्लीत होत असलेल्या बलात्काराच्या घटनांविषयी सरकार अतिशय चिंतीत असून असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरण समजून शिक्षा दिली जावी म्हणून कायद्यात बदल करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. बलात्काऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीचा मुद्दा संसदेपुढे मांडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.