इंडोनेशियाने चार अमली पदार्थ तस्करांना मृत्युदंड दिला असून त्यातील तीन जण परदेशी नागरिक आहेत. त्यांना गोळ्या घालून मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली. फाशीच्या शिक्षेला जगात विरोध असताना अशा पद्धतीने चार जणांना मृत्युदंड देण्यात आल्याने जगभरात संताप व्यक्त करण्यात आला आहे.

इतर १० जणांनाही गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात येणार होता पण तसे करण्यात आले नाही. त्यांच्यात पाकिस्तान, भारत, झिम्बाब्वे व इंडोनेशियन नागरिकांचा समावेश होता. त्यांना मृत्युदंड का देण्यात आला नाही, याचे कुठले कारण अधिकाऱ्यांनी सांगितले नसले, तरी जेथे त्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती, त्या बेटावर मोठे वादळ आल्याने असे करण्यात आले असावे. इतरांना मात्र शिक्षा देण्यात आल्या आहेत.

मृत्युदंडाच्या शिक्षेची अशा पद्धतीने अंमलबजावणी ही काही लोकांचे प्राण घेण्यासाठी करण्यात आली नाही तर अमली पदार्थाची तस्करी पुन्हा कुणी करू नये, असा त्यामागचा हेतू होता असे उप महाधिवक्ता नूर राचमाड यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून व युरोपीय महासंघाने मृत्युदंडास विरोध केलेला असतानाही शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आली. एप्रिलनंतर मृत्युदंडाच्या शिक्षेची ही दुसरी फेरी होती. त्या वेळी आठ  तस्करांना मृत्युदंड देण्यात आला होता, त्यात दोन ऑस्ट्रेलियन नागरिकांचा समावेश असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर संतापाची लाट उसळली होती.