अमली पदार्थाच्या तस्करीवरून श्रीलंकेतील न्यायालयाने पाच भारतीय मच्छीमारांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. कोलंबो उच्च न्यायालयाने पाच जणांना शिक्षा सुनावल्यानंतर भारताने त्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. हे निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे भारताच्या वतीने सांगण्यात आले.
कोलंबो उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश प्रीती पद्मन यांनी ‘हेरॉइन’ या अमली पदार्थाची २०११ मध्ये भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये तस्करी करणाऱ्या आठ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. यात पाच भारतीय मच्छीमारांचा समावेश आहे. यातील तीन जण हे श्रीलंकन आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने या प्रकरणावर गेली चार वर्षे काम सुरू होते. यात तपासाअंती पाचही भारतीय मच्छीमार निर्दोष असल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही उच्च न्यायालयाकडून त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.