दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या कार्यकाळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांची नियुक्ती अनपेक्षित होती. ज्या वेळी राव यांनी सिंग यांना अर्थमंत्री म्हणून नेमण्याचा निर्णय झाला. त्याची माहिती सिंग यांना देण्यासाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. सी. अलेक्झांडर यांनी वारंवार फोन केले. तेव्हा ते झोपेत होते. आपली नियुक्ती अर्थमंत्रिपदी झाली असे सांगितल्यानंतर मनमोहन यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि हा निर्णय अनपेक्षित असल्याचे सांगितले.
अर्थमंत्री झाल्यानंतर नरसिंह राव हे सिंग यांना नेहमी गमतीने म्हणायचे की, जर तुम्ही चांगले काम केले नाही तर तुम्हाला काढून टाकण्यात येईल, अशी आठवण सिंग यांनी सांगितली. मनमोहन सिंग यांची कन्या दामन सिंग यांनी लिहिलेल्या ‘स्ट्रिक्टली पर्सनल : मनमोहन अँड गुरुशरण’ या पुस्तकात सिंग यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान व्हायच्या आधीच्या आठवणींचा आणि घटनांचा समावेश या पुस्तकात आहे. दामन यांनी आपल्या आईवडिलांशी साधलेल्या संवादावर हे पुस्तक आधारित आहे. दामन यांनी ग्रंथालयात खर्च केलेल्या क्षणांचाही उल्लेख या पुस्तकात आहे. पंतप्रधान म्हणून राव यांनी सिंग यांना भारतातील आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आणि भक्कम करण्यासाठी पूर्णपणे वाव दिला.