अनेक दिवसांनी आमच्या काही मित्रांच्या जिवात जीव आला. बिहारमध्ये भाजपचा पराभव झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले होते. त्यांनी म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानात फटाके वाजले की नाही ते माहीत नाही, पण अनेक दिवसांनी लोकांच्या मनात फुलबाज्या उडताना दिसल्या. बऱ्याच दिवसांनी असे वाटले की या विजयामागे लपलेल्या पराभवाकडे पाहूच नये, केवळ त्याचा आनंद लुटावा.
राममनोहर लोहिया म्हणायचे की, सत्य केवळ एका कोनातून बघितले जाऊ शकते; म्हणजे एका कोपऱ्यात बसून पाहता येते. आज बिहार निवडणुकीचे निकाल लागले त्याला ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. एका ठिकाणी बसून बघितले तर मला वाटते बिहारमधील महाआघाडीचा (महागठबंधन) विजय हा लोकशाही मूल्यांचा विजय आहे. आजपासून ३५ वर्षांपूर्वी भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा बिहारमध्ये लालूंनी रोखली होती. आज त्याच बिहारमध्ये मोदींचा अश्वमेध रोखला गेला आहे. यात एक सखोल अर्थ आहे. फार काही वेगळे घडले असेल वा नसेल, पण मोदींचा करिष्मा ओसरला आहे, सत्तेचा अहंकार गेला आहे, लोकेच्छेचा विजय झाला आहे. पक्ष, सरकार व देशात सत्तेच्या एकाधिकाराला जनतेने नाकारले आहे. दिल्ली निवडणुकीत भाजपचा पराभव एक किरकोळ अपवाद आहे असे सांगून वेळ मारून नेता आली, पण आता बिहार निवडणुकांच्या निकालांमुळे असे काही म्हणायची सोय भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राहिलेली नाही. बिहारच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी त्यांची पद-प्रतिष्ठा पणाला लावली होती, पण तरीही अपयश आले ही काही छोटी घटना असूच शकत नाही.
मोदी अडवाणींशी काय बोलले माहिती नाही, पण अडवाणींनी सल्ला दिला असेल तर तो त्यांनी ऐकला असेल की नाही हे कळायला मार्ग नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, आता मोदींना असे सल्ले व बुजुर्गाचा सल्ला निदान ऐकावा तरी लागेल. काही होवो न होवो, या पराभवानंतर लोकशाही संस्थांना दडपण्याच्या प्रयत्नांना पायबंद बसेल, प्रसारमाध्यमांना धमकावताना आता सत्ताधीशांना म्हणजे सरकारला खूप अवघड जाईल.
गेल्या दोन महिन्यात देशात असहिष्णुतेच्या घटना घडल्या त्यांची मालिका संपेल की नाही हे सांगता येणार नाही, पण त्याविरोधातील सूर टिपेला जातील. अल्पसंख्याकांना भाडेकरूचा दर्जा देऊन त्यांची तोंडे बंद केली जातात, ते चालू राहील किंवा बंद होईल पण या प्रश्नावर जी घुसमट आहे त्याला निश्चितच मोकळा मार्ग मिळेल. दादरी घटनेत पंतप्रधान मोदी यांनी तोंड उघडले किंवा नाही उघडले तरी आता देशातील लोकच बोलू लागतील. निवडणूक आयोगाने जातीयवादाचा नंगानाच रोखला नाही, तो बिहारच्या जनतेने रोखला आहे.
बिहारींनी बाहेरच्यांना नाकारले असेल नसेल, पण गुजरातचे विकासाचे प्रारूप नाकारले हे नक्की. बिहारला विकास हवा आहे, पण तो परदेशी गुंतवणुकीवर चालणारा, बुलेट ट्रेनवर आधारित विकास नको आहे. बिहारला वीज, रस्ते यानंतर रोजगार हवा आहे, शिक्षण आणि आरोग्य या गरजांची पूर्तता करून हवी आहे. लोकशाही व्यवस्थेत दोष आपोआप दुरुस्त करण्याची एक अंगभूत क्षमता असते हे बिहारच्या निवडणूक निकालांनी सिद्ध केले आहे.
पण या सगळ्या जल्लोषात गुंग होण्यापूर्वी माझे मन एका कोपऱ्यात बसून सत्य शोधू पाहात आहे.. इस जीत के पीछे छुपी हार को देखने की जिद करने लगता है..
काही वर्षांपूर्वी जेव्हा भाजप बिहारमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता, त्या वेळी पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या पक्षांनी आज भाजपला आसमान दाखवले तर त्यात विशेष काय, असा प्रश्न कुणीही विचारेल. पण भाजपने आजच्या निकालात मिळालेली मते बघितली तर त्यांना तोंड लपवावे लागेल अशी स्थिती आहे. उद्या हीच मते भाजपला बिहारची नवी शक्ती बनवू शकतील काय? देशभरात काँग्रेसचे प्रदीर्घ काळ वर्चस्व होते. त्यामुळे आघाडय़ा व महाआघाडय़ा ही राष्ट्रीय तसेच राज्यांच्या राजकारणातील अपरिहार्यता ठरली. त्याच धर्तीवर बनलेली भाजपेतर आघाडी देशात भाजपचेच वर्चस्व तर प्रस्थापित करणार नाही ना असा प्रश्न पडतो.
महाआघाडीच्या विजयाने बिहारमध्ये पुन्हा एकदा येणाऱ्या पुरोगामी राज्याला भलेही रोखले असेल, पण या जातीयवादी ध्रुवीकरणातून आलेल्या विजयाला सामाजिक न्यायाचा विजय कसे म्हणता येईल? तसेही मागास व अतिमागास व दलित यांना वेगवेगळे करणाऱ्या राजकारणाने सामाजिक न्यायाचे आंदोलन कसे मजबूत होईल? या निवडणुकीने अल्पसंख्याकांना जो दिलासा मिळाला आहे ती मात्र लहान बाब नाही. परंतु हा धर्मनिरपेक्षतेचा विजय आहे असे म्हणता येईल? मुसलमानांना आपल्या जिवाचे व मालमत्तेचे रक्षण करण्याकरिता एकाच पक्षाला मत द्यावे लागले ही त्यांची अपरिहार्यता समजून घेता येईल, पण त्या अपरिहार्यतेचा उत्सव तरी कसा साजरा करावा? विकासाच्या नावाखाली दाखवलेली खोटी स्वप्नेही विकली गेली नसतील, पण लालूप्रसाद यांच्याबरोबर आघाडी करणारे नितीश कुमार यांच्याकडून विकासाची आशा करता येईल का? असे अनेक प्रश्न मनात रुंजी घालत आहेत. या कोपऱ्यात बसून मीच सांगितलेली एक गोष्ट आठवते आहे. मी निवडणुकीच्या सुरुवातीलाच असे म्हटले होते की या निवडणुकीत विजय कोणाचाही होवो, बिहार मात्र हरलेला असेल. विकास, सामाजिक न्याय व धर्मनिरपेक्षता या तीनही बाबतीत या निवडणुकीत बिहारची पीछेहाट होईल. हे आठवून भीतीच वाटली. पण मग मनाची समजूत घातली, की कम से कम आज तो शुभ-शुभ बोलो..
(लेखक सामाजिक-राजकीय भाष्यकार आहेत.)

बिहारमध्ये निकालस्थिती प्रमुख रस्त्यांवर उपलब्ध करून दिली जात होती.

गेल्या दोन महिन्यात देशात असहिष्णुतेच्या घटना घडल्या, त्यांची मालिका संपेल की नाही हे सांगता येणार नाही, पण त्याविरोधातील सूर टिपेला जातील.