भारतात वाघांची संख्या नेमकी किती याचे उत्तर सरकारी आकडेवारीनुसार २२२६ इतके अंदाजे देण्यात आले असले तरी त्याबाबत मतभेद आहेत. वाघांची संख्या १५०० पासून ३००० पर्यंत सांगितली जाते; पण अशा मोघम किंबहुना सदोष पद्धतींवर आधारित अंदाजामुळे धोरण ठरवण्यात अडथळे येत आहेत. देशात २२२६ वाघ आहेत यावर मतभेद असण्याचे कारण म्हणजे त्यांची गणना सदोष पद्धतीने झाली आहे. डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या तज्ज्ञांच्या मते मध्य भारतातील कान्हा नॅशनल पार्कमध्ये वाघांची संख्या ३० टक्के जास्त असावी असे काहींचे म्हणणे आहे. वाघ अभ्यास संशोधक यादवेंद्र झाला यांच्या मते डीएनए फिंगर प्रिटींग तंत्रानुसार कान्हा अभयारण्यात ८९ वाघ आहेत. दुसऱ्या कॅमेरा ट्रॅप तंत्रानुसार ही संख्या ६० आहे. वाघ दिसणे व त्यांची गणना करणे सोपे नसते हे खरेच, पण त्यांच्या गणनेच्या दोन्ही पद्धतीत विश्वासार्हता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिकडेच वाघांविषयीच्या शिखर बैठकीत असे सांगितले होते की, १९७३ मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू झाला. आधी ९ व्याघ्र संवर्धन प्रकल्प होते ते आता ४९ आहेत. देश व राज्य सरकारांची वाघांना वाचवण्याची जबाबदारी आहे. वाघांची संख्या ३० टक्क्य़ांनी वाढली असून २०१० मध्ये ती १७०६ होती २०१४ च्या गणनेनुसार ती  २२२६ आहे, असे मोदी यांनी सांगितले होते. वाघांची संख्या दहा वर्षांत दुप्पट करण्याचे लक्ष्यही काहींनी याच परिषदेत जाहीर केले होते. १०० वर्षांपूर्वी जगात १ लाख वाघ होते, २०१० मध्ये ती संख्या ३२०० होती ती २०२२ मध्ये दुप्पट करण्याचे ठरले. कान्हा नॅशनल पार्कचे संचालक एच.एस. पन्वर यांनी पदचिन्हांची पद्धत शोधून काढली, पण सायन्स इन आशियाचे के.उल्हास कारंथ यांनी ती संशयास्पद ठरवली. त्यानंतर कारंथ यांच्या चमूने कॅमेरा ट्रॅपिंग ही पद्धत शोधली; त्यात दूरस्थ कॅमेरे लावून  वाघांनाच सेल्फी काढायला लावल्यासारखी स्थिती असते. पण ती पद्धत खर्चिक आहे. त्यामुळे कॅप्चर अँड रिकॅप्चर किंवा पॅटर्न रेकनिशन सॉफ्टवेअर या पद्धती पुढे आल्या. त्यात वाघांची संख्या कमी होत असल्याचे सांगण्यात आले होते. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाचे प्रमुख राजेश गोपाल यांनी वाघांच्या रक्षणात मोठी भूमिका पार पाडली. कॅमेरा ट्रॅप पद्धतीनुसार भारतात २२२६ वाघ आहेत. काही ठिकाणी कॅमेऱ्यांची नक्षल्यांनी नासधूस केली आहे त्यामुळे अडचणी आल्या आहेत. वाघांची विष्ठा व केस गोळा करून डीएनए पद्धतीने वाघांची संख्या मोजता येते, ती अधिक विश्वासार्ह आहे. हैदराबाद व बंगळुरू येथे ते तंत्र उपलब्ध आहे पण काहींचा या तंत्रावरही आक्षेप आहे. झाला यांच्या मते काही ठिकाणी बिबटय़ांचा वाघात समावेश करण्यात आला आहे. चुकीच्या डीएनए तंत्राने नर्मदेच्या दक्षिणेकडे ५० हजार वाघ असल्याचेही एका अभ्यासात सांगण्यात आले होते, पण या सगळ्या आकडय़ात गोंधळ असून त्यात न पडता व्याघ्र संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे कारंथ यांचे मत आहे.