‘आम्ही दुसऱ्यावर राज्य करत नाही, मात्र आमचा अपमान करणाऱ्यांना देखील माफ करत नाही.’ अशा भाषेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकिस्तानला ठणकावले. उरी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या कारवाईमुळे पाकिस्तानला धक्का बसला आहे, असे पर्रिकर यांनी म्हटले आहे. एखाद्या रुग्णाची शस्रक्रिया करताना त्याला भूल देऊन शस्रक्रिया केली जाते, अगदी त्याच पद्धतीने भारतीय लष्कराने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. असे पर्रिकर म्हणाले.

त्यामुळेच भारतीय लष्कर आपल्या भूमीत कधी आले आणि ‘मिशन फत्ते’ करुन कधी परतले याचा पाकिस्तानला सुगावा सुद्धा लागला नाही, असे सांगत या कारवाईमुळे पाकिस्तान आजही गुंगीतच आहे, असा टोला पर्रिकरांनी लगावला. उरी येथील लष्करी तळावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराने पाच थप्पड मारल्याचे सांगत लष्कराच्या नियोजनबद्ध कारवाईचे पर्रिकरांनी कौतुक केले.

भारतीय लष्कराने ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या कारवाईने पाकव्याप्त काश्‍मीरच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर हल्ले करून घुसखोरीच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केलेली नाही, सीमेवर गोळीबार केला व त्यात आमचे दोन सैनिक मारले गेले, असा दावा पाकिस्तानने केला होता. पाकिस्तानच्या या दाव्याला पर्रिकरांनी खोडून काढले. भारतीय लष्कराने दिलेली भूल उतरली नसल्यामुळे पाकिस्तान अद्यापही गुंगीत असल्याचेही त्यांनी म्हटले.

भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री नियंत्रण रेषा ओलांडत, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले आणि उरी येथील लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचा हिशेब चुकता केला. सुमारे पाच तासांच्या या लक्ष्यभेदी कारवाईत किमान ४० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.