सशस्त्र दलामध्ये महिलांच्या सहभागाचे प्रमाण कमी असल्याबद्दल संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी शनिवारी चिंता व्यक्त केली. सशस्त्र दलात महिलांच्या सहभागाचे प्रमाण वाढण्यासाठी केंद्र सरकार येत्या काही महिन्यांत अनेक निर्णय घेणार असल्याचे पर्रिकर यांनी सांगितले.
देशातील सशस्त्र दलात केवळ तीन हजार २९८ महिला कर्मचारी आहेत, ही आकडेवारी वेदनादायी आहे, असे पर्रिकर म्हणाले. ‘माई भागो आर्मड फोर्सेस प्रिपरेटरी इन्स्टिटय़ूट’ संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
देशातील सशस्त्र दलात महिलांचा समावेश व्हावा यासाठी महिलांना विशेष प्रशिक्षण देण्यासाठी पंजाब सरकारने ही संस्था स्थापन केली आहे. सशस्त्र दलांत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी येत्या एक-दोन महिन्यांत अनेक निर्णय घेण्यात येणार आहेत, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
सशस्त्र दलात महिलांनी सहभागी होण्याच्या मार्गात काही र्निबध येतात त्याबाबत सरकार विचार करीत आहे. महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.