दिल्लीतील राजौरी गार्डन भागात महिला डॉक्टरवर झालेल्या अॅसिड हल्ल्याप्रकरणी पोलीसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या हल्ल्याचा कट रचणारी व्यक्ती स्वतःही डॉक्टर असल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एकतर्फी प्रेमातूनच डॉक्टर तरुणाने संबंधित तरुणीवर अॅसिड हल्ला करण्यासाठी दोघांना सुपारी दिल्याची माहिती मिळाली.
राजौरी भागात भरदिवसा डॉक्टर तरुणीवर दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी अॅसिड फेकले होते. या हल्ल्यात संबंधित तरुणी जखमी झाली. या घटनेनंतर दिल्ली पोलीसांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दोघांना ताब्यात घेतल्यावर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी आणखी दोघांना अटक केली. या सर्वांकडून मिळालेल्या माहितीवरूनच पोलीस हा संपूर्ण कट रचणाऱया व्यक्तीपर्यंत पोहोचू शकले. एकतर्फी प्रेम करणाऱया तरुणाला संबंधित तरुणीने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडून त्याने हा कट रचला. अॅसिड फेकण्यासाठी त्याने दोन तरुणांना पैसे दिले होते, अशीही माहिती मिळाली आहे. हल्लेखोरांपैकी एकजण अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. संबंधित आरोपीचे वय नक्की किती आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.