दिल्लीच्या गल्लीबोळात आत्तापासूनच एक विजयरथ फिरतोय. हा अत्याधुनिक विजयरथ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा. या विजयरथावर केवळ मोदी व मोदीच आहेत. मालवाहू ऑटो. त्याला रथाचे स्वरूप दिलेले. एका बाजूला एलईडी स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरू असते. साधारण अर्धा मैल ऐकू येईल इतक्या मोठय़ा आवाजात मोदी भाषण देतात. भाईओं व बहनों.. देश जिताया है. दिल्ली भी जिताओ.. मित्रों (ओओओ) अशी लांबलचक साद घालून मोदी मतं मागतात. अधूनमधून मोदींची गाजलेली भाषणे दाखवली जातात. अगदी अमेरिकेतील भाषणातील काही दणदणीत वाक्ये. त्या वाक्यांना मिळालेला प्रतिसाद. या रथाभोवती स्वत:च्याच सायकल रिक्षावर अंमळ पाय पसरून विसावलेला ‘आम आदमी’ मोदींचे भाषण ऐकतो. दिवसभर सायकल रिक्षा ओढून दमलेला असल्याने मोदींच्या प्रभावी भाषणावर प्रतिक्रिया देण्याची शारीरिक क्षमता नसते. पण मन लावून ऐकतो. रथाभोवती पन्नासेक जण जमलेले असतात. रस्त्यावरून जाणारे नुसतेच डोकावून जातात. एखाददुसरा चारचाकीतून जाणारा रस्ता अडवला म्हणून- ‘भैन के..’ अशी अस्सल दिल्लीची शिवी हासडतो. तुच्छतेचा कटाक्ष टाकून कर्णकर्कश हॉर्न वाजवत गाडी झर्रकन घेऊन जातो. स्क्रीनवर भाषण देणारे मोदी एव्हाना महाराष्ट्र-हरियाणामार्गे दिल्लीत पोहोचलेले असतात. रामलीला मैदानावरून दिलेली आश्वासने पुन्हा एकदा मोदींच्या भाषणातून ऐकवली जातात. केंद्राप्रमाणेच राज्यातही (भाजपचेच) स्थिर सरकार देण्याचे आश्वासन मोदी भाषणातून थकल्या-भागल्या जीवांना देत असतात. साधारण सतरा-अठरा मिनिटांचा व्हिडीओ संपतो.
काही सायकल रिक्षाचालकांना मनोरंजक वाटते, तर काही संभ्रमात पडतात. मेट्रो स्टेशनपर्यंत सोडण्यासाठी काही प्रवासी सायकल रिक्षावाल्याला विचारतात. दिवसभराच्या परिश्रमामुळे थकल्याने तो नाहीच म्हणतो. प्रवासी अडून बसतात, मेट्रो स्टेशनवर सोडण्याचा आग्रह करतात. तरीही त्याचे उत्तर नाहीच असते. प्रवासी वैतागतात. मनातल्या मनात शिवी हासडून – आम आदमी पक्षाच्या नावाने कडाकडा बोटे मोडतात. ‘आप’मुळेच तुमचा ‘अ‍ॅटिटय़ूड’ बदलला, असे कोसून प्रवासी पायीच मेट्रो स्टेशनकडे कूच करतात. सायकर रिक्षाचालक सुखावतो. मागील विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने दिलेले स्वस्त विजेचे स्वप्न प्रत्यक्षात आल्याची सुखद आठवण त्याला होते. उभ्या असलेल्यांशी तो त्याबद्दल सहजपणे बोलून जातो. आप सरकारमध्ये वीज स्वस्त झाली तेव्हा अर्थतज्ज्ञ, भाजप-काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली होती. आता प्रत्येक राजकीय पक्ष वीज स्वस्त देण्याची भाषा करीत आहे. हा फरकठळक तो त्याच्याशी आत्मीयतेने बोलणाऱ्या चाटवाल्याशी सांगतो. मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ व मघाच्या प्रवाशाकडून मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे झालेला सायकल रिक्षाचालकाचा गोंधळ काहीसा दूर झालेला असतो. सायकल रिक्षावाला घराकडे जायला निघतो. त्याच्या सायकल रिक्षावर मागे (ऊन-वारा-पावसापासून बचाव करण्यासाठी लावलेले) पोस्टर चाटवाला दृष्टिआड होईस्तोवर पाहत राहतो. पोस्टरवर लिहिलेले असते- पाँच साल-केजरीवाल.!
-चाटवाला