दिल्ली भाजपचे अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटला घडली आहे. दिल्लीच्या मध्यभागात असणाऱ्या तिवारी यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला केल्याचा प्रकार सकाळी समोर आला. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी मनोज तिवारी निवासस्थानी नव्हते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून इतर चार संशयितांचा शोध सुरू आहे.

‘नॉर्थ्य अॅव्हेन्यूमधील १५९ क्रमांकाच्या निवासस्थानी ८ ते १० लोकांनी हल्ला केला,’ असे ट्विट सोमवारी सकाळी मनोज तिवारी यांनी केले. हल्लेखोरांनी घरात शिरुन खोलीत प्रवेश केला आणि त्यानंतर घरातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप तिवारी यांनी केला. यासोबतच पोलिसांच्या वर्दीतील एकाने हल्लेखोरांना संरक्षण दिल्याचा आरोपदेखील तिवारी यांनी केला. ‘ज्याप्रकारे पोलिसाने हल्लेखोरांना संरक्षण दिले, त्यावरुन यामागे नक्की कारस्थान आहे,’ असे मनोज तिवारी यांनी म्हटले.

‘मी डिसीपींशी बोलल्यावर त्यांनी अतिरिक्त पोलीस पाठवले. त्या पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले,’ अशी माहिती मनोज तिवारी यांनी दिली. घडलेला प्रकार हा ‘सर्वात मोठा’ असल्याचे तिवारींनी म्हटले. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, असेदेखील त्यांनी म्हटले. ‘हल्लोखोर घरातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत होते आणि माझा शोध घेत होते. दिल्लीमध्ये नेमके काय सुरू आहे? माझे घर पोलीस स्थानकापासून फक्त १०० पावलांवर आहे. खासदाराच्या घरावर हल्ला होतो आहे आणि त्याच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली जात आहे,’ असे तिवारी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.

या प्रकरणाची माहिती गृह मंत्रालयाला देणार असल्याचे मनोज तिवारी यांनी सांगितले. मनोज तिवारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नुकत्याच झालेल्या दिल्लीतील महानगरपालिका निवडणुकांमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. तीन महापालिकांमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत भाजपने हॅट्रिक साजरी केली आहे.