आफ्रिकन लोकांच्या एका गटाने दक्षिण दिल्लीत राजपूर खुर्द येथे पहाटेच्या वेळी कॅबचालकाला मारहाण केली. ज्या वसाहतीत ही घटना घडली तेथे आफ्रिकी नागरिकांवर गेल्या आठवडय़ात हल्ल्याच्या चार घटना घडल्या होत्या. पहाटे चारच्या सुमारास कॅब चालक नुरुद्दीन हा मेहरौलीतील राजपूर येथे प्रवाशांना आणण्यासाठी गेला असताना ही घटना घडली. चार आफ्रिकी पुरुष व दोन महिला यांनी नुरुद्दीन याच्याशी सहाजणांना वाहनात बसवलेच पाहिजे असे सांगून वाद घातला. नंतर त्यांनी नुरुद्दीन याच्यावर हल्ला केला असून त्यात तो जखमी झाला आहे. त्याने एका महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला असता ती रवांडाची असल्याचे समजले. चालकाने नंतर पोलिसांना बोलावले. त्याच्या तोंडावर जखमा झाल्या असून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत त्याला उपचारांसाठी दाखल केले आहे. सदर महिलेला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आफ्रिकी नागरिकांवर गेल्या काही दिवसात हल्ले झाले असून त्यात काँगोच्या एका युवकाला ठार करण्यात आले, तर हैदराबाद येथे नायजेरियाच्या विद्यार्थ्यांवर पार्किंगच्या वादातून हल्ला झाला आहे. आफ्रिकी नागरिकांवरच्या हल्ला प्रकरणात पाचजणांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

परराष्ट्र सचिवांचे आश्वासन

परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी आफ्रिकी लोकांच्या जीवित व वित्त संरक्षणाची आमच्या देशाला काळजी आहे असे सांगून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. आफ्रिकी विद्यार्थ्यांच्या गटाची त्यांनी भेट घेतली. अलीकडेच काँगोचा विद्यार्थी मसोंडा केटाडा ऑलिव्हर हा जमावाच्या हल्ल्यात ठार झाला होता. त्यानंतरही आफ्रिकी लोकांवर हल्ले झाले होते त्यामुळे आफ्रिकी समुदाय मंगळवारी जंतरमंतर येथे निदर्शने करणार आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी काल आफ्रिकी लोकांच्या सुरक्षेची बाब गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या कानावर घातली होती. त्यानंतर हल्लेखोरांवर कठोर कारवाईचे आदेश राजनाथ सिंह यांनी दिल्ली पोलिसांना दिले होते. आफ्रिकी समाजाच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे परराष्ट्र सचिव जयशंकर यांनी सांगितले.

परराष्ट्र सह सचिव बिरेंदर यादव यांनी काँगोचा मृत विद्यार्थी मसोंडा केटाडा ऑलिव्हर याच्या कुटुंबीयांची  विमानतळावर भेट घेतली व त्यांना सरकारकडून सर्व सहकार्याचे आश्वासन दिले. संबंधित विद्यार्थ्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर खटले भरले जातील असे आश्वासन त्यांनी ऑलिव्हरच्या कुटुंबीयांना दिले आहे.

ऑलिव्हरच्या कुटुंबीयांकडून भारतीय अधिकाऱ्यांनी भेट

नवी दिल्ली- कोंगोतील नागरिकाची येथे २० मे रोजी हत्या करण्यात आली होती त्याच्या कुटुंबीयांची भारतीय अधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि या प्रकरणाची सुनावणी तातडीने करून गुन्ह्य़ात सहभागी असलेल्यांना कठोर शासन करण्याची ग्वाही त्यांना दिली. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मासोंदा केतडा ऑलिव्हरच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. ऑलिव्हरचा मृतदेह मायदेशी पाठविण्यासाठी येणारा खर्च भारत सरकार करणार असल्याचेही या वेळी कुटुंबीयांना सांगण्यात आले. ऑलिव्हरच्या कुटुंबीयांनी भारत सरकारचे आभार मानल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. दिल्लीच्या वसंत कुंज परिसरात रिक्षावरून झालेल्या वादावादानंतर ऑलिव्हर याला बेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये तो मरण पावला.