दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगाची वॅगन-आर कार सचिवालयासमोरून गुरुवारी चोरीला गेली. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

केजरीवाल यांची निळ्या रंगाची वॅगन-आर कार दिल्लीच्या सचिवलयाबाहेर पार्क करण्यात आली होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही कार येथे नसल्याचे आढळून आले. कार चोरीला गेल्याचे निष्पन्न झाल्याने स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. काहीवेळातच प्रसारमाध्यमांना या बातमीचा सुगावा लागला. मात्र, याबाबत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अद्याप कुठलीही थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिल्ली पोलिसांच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे.

सर्वसामान्य व्यक्ती म्हणून केजरीवालांच्या इमेज बिल्डिंगमध्ये या कारचा मोठा वाटा आहे. यापूर्वी ही कार ‘आप’च्या पदाधिकारी आणि मीडिया सेलच्या प्रमुख वंदना यांच्याकडे होती. मात्र, सध्या ही कार केजरीवाल वापरत होते. २०१५ मध्ये ही कार प्रकाशझोतात आली होती. ‘आप’चे समर्थक कुंदन शर्मा यांनी ही कार केजरीवाल यांना पक्षाच्या कामाकरिता वापरण्यासाठी दिली होती. पक्षाचे नेते प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही कार परत देण्याची मागणीही करण्यात आली होती.