23 September 2017

News Flash

‘हवाला’मध्ये अरविंद केजरीवाल यांचा सहभाग, कपिल मिश्रांचा पुन्हा आरोप

'आप'वर आरोप करत असल्यामुळे कदाचित माझी हत्या होऊ शकते,

नवी दिल्ली | Updated: May 19, 2017 2:43 PM

हेमप्रकाश शर्मा हा घोटाळेबाज आहे. त्या व्यक्तीचा अनेकांकडून तपास सुरू आहे. तो कोणालाच सापडत नाही. पण केजरीवाल यांना तो भेटतो, असा टोला त्यांनी लगावला.

दिल्ली सरकारचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षातून निलंबित करण्यात आलेले कपिल मिश्रा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोपांची तोफ डागली आहे. केजरीवाल हे हवाला व्यापार करतात, असा गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत त्यांनी केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. तत्पूर्वी, ट्विट करून केजरीवाल यांचा भंडाफोड करणार असल्याचे मिश्रा यांनी म्हटले होते. या वेळी त्यांनी केजरीवाल हे काळा पैसा पांढरा करत असल्याचे म्हटले. या वेळी त्यांनी अरविंद केजरीवाल आणि आपमधील इतर सदस्यांनी मुकेश कुमार नावाच्या व्यक्तीचा शेअर केलेला व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला. हेमप्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी केजरीवाल आणि आपने मुकेशकुमारला पुढे केले आहे. पक्षाला देणगी देणाऱ्या कंपन्यांचे लेटरहेड त्यांनी घरात तयार केले. सनव्हिजन कंपनीच्या लेटरहेडवरील सही मुकेशकुमार याची नव्हतीच. केजरीवाल आणि आपवर मी आरोप करत असल्यामुळे कदाचित माझी हत्याही होऊ शकते, अशी भीती मिश्रा यांनी व्यक्त केली.

केजरीवाल यांनी पक्षाला कोठून निधी मिळाला याची माहिती नसल्याचे म्हटले होते. आता त्यांनी दोन कोटी रूपये निधी कुठून आला, याची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यावी, असे आव्हान  त्यांनी दिले. हा निधी महापालिका निवडणुकीच्या एक दिवस आधी आला होता. ज्या मुकेशकुमारने पक्षाला निधी दिला. त्यावेळी तो कंपनीमध्येही नव्हता. केजरीवाल यांनी मुकेशकुमारच्या दाव्याची प्राथमिक चौकशी केलीच नाही. बरं झालं हा व्हिडिओ केजरीवाल यांनीच शेअर केला, अशी खोचक प्रतिक्रिया मिश्रा यांनी दिली.

या कंपन्या बनावट असल्याचे मिश्रा यांनी म्हटले. मुकेश कुमार याचीही कंपनी बनावट आहे. यासंबंधी एक व्हिडिओ जारी केला आहे. मिश्रा म्हणाले, मुकेश दिवाळखोर आहे. त्याची इमारत सील करण्यात आली आहे. जो व्यक्ती व्हॅट देत नाही, कर देत नाही पण केजरीवाल यांच्या पक्षाला २ कोटी रूपये कसे देतो, असा सवाल उपस्थित केला. हा सरळसरळ सरकारी शक्तीचा दुरूपयोग आहे. ही कंपनी जानेवारी २०१४ मध्ये बंद होणे आवश्यक होते. पण ती अद्याप सुरू आहे. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा घोटाळा असल्याचे ते म्हणाले.

आपला देणगी देणाऱ्या सर्व कंपन्या या बनावट असल्याचा दावा त्यांनी केला. हेमप्रकाश शर्मा हा घोटाळेबाज आहे. त्या व्यक्तीचा अनेकांकडून तपास सुरू आहे. तो कोणालाच सापडत नाही. पण केजरीवाल यांना तो भेटतो, असा टोला त्यांनी लगावला. हवालाचा इतका मोठा घोटाळा यापूर्वी कधीच झाला नव्हता. नोटाबंदीनंतर केजरीवाल गोंधळलेले, चिडलेले होते. कारण जिथे-जिथे छापे पडत होते. तिथे त्यांची माणसं बसलेली असत.

केजरीवाल यांना पुन्हा आव्हान देत त्यांनी हिंमत असेल तर राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केली. जर आपच्या सदस्यांच्या विदेश दौऱ्याची माहिती बाहेर आली तर केजरीवाल यांना देश सोडून जावे लागेल, असे ते म्हणाले.

First Published on May 19, 2017 1:41 pm

Web Title: delhi cm arvind kejriwal kapil mishra blame hawala scam aap
  1. S
    Shriram Bapat
    May 19, 2017 at 3:37 pm
    Why is AAP finding it so difficult to give information regarding foreign countries travel by its members. Their silence regarding this matters make all of us feel that "Dalme jarur kuchh kala hai"
    Reply