दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे महिला व बालकल्याण मंत्री संदीप कुमार यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली आहे. संदीप कुमार यांच्याविरोधातील सीडी मिळाल्यावर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे . ट्विटरवरुन अरविंद केजरीवाल यांनी संदीप कुमार यांच्याकडून मंत्रिपद काढून घेतल्याची घोषणा केली आहे.
रोज आपल्या पत्नीच्या पाया पडतो असे सांगून काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले संदीप कुमार महिलांसोबत या सीडीमध्ये आक्षपार्हस्थितीत दिसून आल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. संदीप कुमार मूळचे हरियाणातील सारंगथल गावातील आहेत. केजरीवाल सरकारमधून हकालपट्टी करण्यात आलेले संदीप कुमार हे तिसरे मंत्री आहेत. यापूर्वी जितेंद्र तोमर आणि असिम अहमद खान या मंत्र्यांना केजरीवाल सरकारने बाहेरचा रस्ता दाखविला होता.
आम्हाला संदीप कुमार यांची आक्षेपार्ह सीडी मिळाली आहे. आम्ही असे प्रकार खपवून घेणार नाही, असे सांगत केजरीवाल यांनी संदीप कुमार यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले.