दिल्लीतील औरंगजेब रस्त्याला डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव देण्याच्या दिल्ली महानगरपालिकेच्या निर्णयावर असदुद्दीन ओवेसी यांनी कडाडून टीका केली. आपण हिंदु विरुद्ध मुस्लिम असा इतिहास का तयार करत आहोत. दिल्लीच्या सुलतान आणि मुघलांना भारताबद्दल आपलेपणा वाटत होता. हिंदु स्त्रियांशी विवाह करणाऱ्या औरंगजेबाच्या रक्तातही राजपुतांचा अंश असल्याचे ओवेसी यांनी सांगितले. सरकार एखाद्या रस्त्याला डॉ. कलामांचे नाव देऊन काय साधणार आहे. त्याऐवजी दलित आणि मुस्लिमांना वैज्ञानिक शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने डॉ. कलामांच्या नावे एखादी  शिष्यवृत्ती सुरू करावी, असेही ओवेसी यांनी म्हटले. नवी दिल्ली महानगरपालिकेने ‘औरंगजेब रोड’चे नाव बदलून रस्त्याचे नामकरण डॉ.एपीजे कलाम असे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून नवी दिल्ली महानगरपालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले होते. भाजपचे नगरसेवक महेश गिरी यांनी या रस्त्याला डॉ.कलाम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला ‘ट्‌विटर‘वर जोरदार समर्थन मिळाले होते.

मात्र, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी केजरीवालांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. औरंगजेब रोडचा इतिहास वाचण्याचा सल्ला ओवेसी यांनी केजरीवालांना दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी डॉ. कलाम यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सादर केला आणि केजरीवालांनी तो प्रस्ताव स्वीकारला, यातून काय संदेश देण्याचा प्रयत्न होतो आहे? असा सवालही ओवेसींनी उपस्थित केला.