दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील बाल गुन्हेगारबाबतच्या खटल्याच्या सुनावणीचा निकाल बाल गुन्हेगार न्याय मंडळाने ५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला आहे.
बाल गुन्हेगाराची निश्चित व्याख्या काय, त्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने प्रधान दंडाधिकारी गीतांजली गोयल यांनी निकाल ५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला आहे. त्याचप्रमाणे दरोडय़ाप्रकरणी बाल गुन्हेगाराला यापूर्वीच न्याय मंडळाने दोषी ठरविले असून त्याबाबतचा निकालही ५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम स्वामी यांनी बाल गुन्हेगाराची व्याख्या स्पष्ट करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आपली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, ही माहिती बाल गुन्हेगार न्याय मंडळाच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्वामी यांना दिले. त्यानुसार स्वामी यांनी मंडळाला त्याची कल्पना दिली आहे.