गेल्या १६ डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी मुकेश नावाच्या आरोपीने आपण निर्दोष असल्याचे सांगून अन्य पाच जणांनी हे निर्घृण कृत्य केल्याचा दावा येथील न्यायालयात बुधवारी केला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांच्यासमोर आपण दोषी नसल्याची बतावणी करताना मुकेश याने त्या दिवशी आपण केवळ बस चालवीत होतो आणि अन्य पाच जणांनी या मुलीवर बलात्कार करून तिला आणि तिच्या मित्रास धावत्या बसबाहेर फेकून दिले, अशी माहिती दिली.
दक्षिण दिल्लीतील मलाई मंदिराजवळच्या एका उड्डाणपुलाजवळ बस आली असता एकाने बसमधील दिवे मालवून टाकले, असेही मुकेश म्हणाला.
 याप्रकरणी राम सिंग, विनय शर्मा, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता, मुकेश आणि एका अल्पवयीन मुलाने सदर मुलीवर बलात्कार केल्याचा पोलिसांचा अहवाल असून राम सिंग हा ११ मार्च रोजी तिहार तुरुंगात मृतावस्थेत आढळला होता.