दिल्लीत १६ डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये झालेल्या अमानुष सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील पाच आरोपींना आज साकेत न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. ३ जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना सादर करण्यासाठी प्रोडक्शन वॉरंट जारी केलं होतं. बलात्का-यांविरोधात सुमारे हजार पानांच्या या आरोपपत्रामध्ये आरोपींविरुद्ध खुनाच्या आरोपासह नऊ कलमांखाली खटला भरण्यात आला असून ४० साक्षीदारांचीही नावे घालण्यात आली आहेत. बलात्कारप्रकरणातील सहावा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरोधातील सुनावणी जुवेनाईल न्यायालयात होणार आहे.  
आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी सामूहिक बलात्काराव्यतिरिक्त खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, लूट, पुरावे नष्ट करणे आणि अनैसर्गिक कृत्य करण्याच्या आरोपांखाली कलम ३०२, ३०७, ३७६, ३७७, ३६५, ३९४, २०१ आणि ३४ अंतर्गत खटला दाखल केला आहे. सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचारादरम्यान, पीडित तरूणीचा २९ डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता.