ज्या घटनेनंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली, त्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील अपेक्षित पहिला निकाल गुरुवारी लांबणीवर पडला. हा निकाल आता २५ जुलैला लागण्याची शक्यता आहे. या घटनेतील एक आरोपी ज्याच्यावर बाल गुन्हेगारी कायद्यांतर्गत खटला चालवण्यात आला, त्याचा निकाल न्यायालय गुरुवारी सुनावण्याची शक्यता होती. मात्र, तो आता २५ जुलैला लागण्याची शक्यता आहे.
मार्चमध्ये संबंधित आरोपीविरुद्ध दिल्लीतील मुख्य न्यायदंडाधिकाऱयांच्या न्यायालयात खटल्याला सुरुवात झाली होती. यावरील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ५ जुलैला संपला. वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या आणि सामूहिक पाशवी बलात्कारामुळे मृत्युमुखी पडलेल्या पीडितेवर या अल्पवयीन मुलानेच त्यादिवशी सर्वाधिक शारीरिक अत्याचार केले होते, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने न्यायालयात केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. अल्पवयीन आरोपीने त्या रात्री रामधर नावाच्या प्रवाशाची संबंधित बसमध्ये लूट केली होती. त्याचाही निकाल न्यायालय देण्याची शक्यता होती. मूळ उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला हा अल्पवयीन आरोपी वयाच्या ११ व्या वर्षी घरातून पळून दिल्लीमध्ये आला होता. दरम्यान, अल्पवयीन आरोपीने त्याच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सामूहिक बलात्कारामध्ये आपला कोणताही संबंध नसल्याचे संबंधित आरोपीने म्हटले आहे.