१६ डिसेंबर २०१२च्या रात्री दिल्लीत २३ वर्षीय तरुणीवर पाशवी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमांपैकी दोघांच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात या दोघांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती.
दिल्ली बलात्कार घटनेतील आरोपी विनय शर्मा (२१) आणि अक्षय ठाकूर (२९) या दोघांनी दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्यावर सोमवारी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई व एन. व्ही. रामण्णा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने या दोघांच्याही फाशीला स्थगिती दिली. याआधीही मुकेश (२७) आणि पवन गुप्ता (२०) या दोघांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य एका आरोपी रामसिंह हा गेल्या वर्षी तुरुंगात मृतावस्थेत आढळला होता. तर अन्य एका आरोपीला बालगुन्हेगारी कायद्याखाली बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने यंदा १३ मार्च रोजी विनय, अक्षय, मुकेश व पवन या चौघांना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, आपल्याविरोधात सबळ पुरावे उपलब्ध नसताना व संबंधित तरुणी व तिच्या मित्राच्या जबानीवरून दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्याला शिक्षा ठोठावली असल्याचा दावा करत शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका विनय आणि अक्षय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. संबंधित तरुणीने स्वखुशीने जबाब नोंदवला असल्याचे दंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र, एखादी तरुणी मरणासन्न अवस्थेत असताना स्वखुशीने व तोंडाने कसा जबाब नोंदवू शकेल, त्यामुळे तिने केलेल्या हातवाऱ्यांवरून तसेच मित्राच्या जबानीवरून आमच्यावर आरोपपत्र कसे दाखल केले जाऊ शकते, असा आक्षेप घेत दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फेरआढावा घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यावर खंडपीठाने या दोघांच्याही फाशीला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, दोघा नराधमांच्या फाशीला स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दुख झाल्याची प्रतिक्रिया संबंधित तरुणीच्या आईने व्यक्त केली आहे.