संपूर्ण देशवासियांच्या अंगावर शहारा आणणाऱया दिल्लीतील त्या पाशवी बलात्कार खटल्याच्या सुनावणीला येथील जलदगती न्यायालयात सुरुवात झाली. या क्रूर घटनेचा एकमेव साक्षीदार आणि मृत्युमुखी पडलेल्या पीडितेच्या मित्राची साक्ष मंगळवारी न्यायालयात नोंदविण्यात आली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश खन्ना यांच्या न्यायालयात हा २८ वर्षांचा युवक व्हिलचेअरवरून आला होता. साक्ष नोंदविण्यासाठी न्यायालयात यावे, यासाठी त्याला समन्स बजावण्यात आले होते. त्याने घडलेली घटना न्यायालयाला सांगितली.
न्यायालयाने या खटल्यातील पाच आरोपींवर भारतीय दंडविधान संहितेच्या विविध १३ कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. खटल्यातील सहावा आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर बालगुन्हेगारी कायद्यानुसार आरोप ठेवण्यात आले आहेत.
खटल्याचा निकाल लवकर देण्यासाठी रोज त्याची सुनावणी होणार आहे. पाच आरोपींवर आयपीसीमधील ३०२ कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये जर ते दोषी आढळले तर त्यांना फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने मंगळवारी आणखी एका कलमाची आरोपांमध्ये भर घातली. संबंधित मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप कलम ३६६ नुसार ठेवण्यात आला.
बलात्कार करण्यात आलेल्या बसचा चालक रामसिंग, त्याचा भाऊ मुकेश, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षय सिंग यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.