दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आलेल्या तेवीस वर्षांच्या तरुणीने अखेर येथील माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे सव्वादोन वाजता अखेरचा श्वास घेतला. तिच्या निधनाने मानवतेची लढाई आपण हरलो आहोत. तिच्यावरील बलात्कार व क्रूर अत्याचारामुळे भारतीय समाजात स्त्रियांना दिल्या जात असलेल्या वागणुकीचा व त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांचा प्रश्न गांभीर्याने पुढे आला आहे. सुरुवातीला येथील सफदरजंग रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर तिला गुरुवारी सकाळी सिंगापूर येथे हलवण्यात आले होते, सुरुवातीला तिने उपचारांना थोडासा प्रतिसाद दिला होता. पण नंतर तिची प्रकृती आणखी ढासळत गेली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान मनमोहन सिंग, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आदींनी या मुलीच्या दुर्दैवी निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एलिझाबेथ हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. केलविन लोह यांनी सांगितले, की तिच्या निधनाची वार्ता जाहीर करताना आम्हाला अति दु:ख होत आहे. पहाटे सव्वादोन वाजता तिचा मृत्यू झाला. तिचे कुटुंबीय व भारतीय दूतावासाचे अधिकारी अंत्यसमयी रुग्णालयात होते. माउंट एलिझाबेथ रुग्णालयाचे डॉक्टर व परिचारिका यांनी तिचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही. नंतर तिचे पार्थिव सिंगापूर सरकारी रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आले असून खास विमानाने ते भारतात आणले जाणार आहे.
गेल्या १६ डिसेंबर रोजी या मुलीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये सहा जणांनी सामूहिक बलात्कार करून तिला तिच्या सहकाऱ्यासह फेकून दिले होते. सिंगापूरमधील भारतीय उच्चायुक्त टी.सी.ए. राघवन यांनी सांगितले, की या मुलीच्या कुटुंबीयांनी अद्याप तिच्या अंत्यसंस्काराबाबत काही ठरवलेले नाही. या मुलीने जीवनाच्या लढाईत अखेपर्यंत झुंज दिली, प्रगत वैद्यकीय उपचारांसाठी तिला सिंगापूरला आणले होते.
दूतांनी सांगितले, की या मुलीचे कुटुंबीय तिच्या निधनाने उद्ध्वस्त झाले आहेत, तिच्यावर करण्यात आलेल्या उपचारांबाबत ते समाधानी आहेत, पण तिच्या शरीरावरील जखमाच इतक्या तीव्र होत्या, की तिच्याकडे गांभीर्याने लक्ष पुरवणे गरजेचे होते. तिचे शेवटचे काही तास ही कुटुंबीयांसाठी अग्निपरीक्षा होती, तरीही त्यांनी अतिशय धैर्याने या परिस्थितीस तोंड दिले.
राघवन यांनी सांगितले, की पंतप्रधानांनी पाठवलेला शोकसंदेश आम्ही तिच्या कुटुंबीयांना दिला आहे. भारत हा स्त्रियांसाठी एक सुरक्षित देश राहील असे वातावरण तयार करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. दूतावासाला जगभरातून अनेक संदेश मिळाले असून सिंगापूर सरकारनेही तिच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. सिंगापूरचे परराष्ट्र मंत्रालय, सरकार व माउंट एलिझाबेथ रुग्णालय यांनी गेल्या दोन दिवसांत खूप सहकार्य केले. या मुलीला दिल्लीहून सिंगापूरला हलवल्याच्या संदर्भात त्यांनी सांगितले, की सफदरजंग रुग्णालय व एलिझाबेथ रुग्णालय यांच्या डॉक्टरांमध्ये चर्चा झाली व त्यानंतर पूर्ण विचाराअंती हा निर्णय घेतला होता.
दिल्लीहून सिंगापूरला नेतानाच तिचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली गेली होती का, या प्रश्नावर राघवन यांनी सांगितले, की अशा कुठल्याही शंका उपस्थित केल्या गेल्या नव्हत्या. तिला दिल्ली व सिंगापूर येथे सर्वोत्तम उपचार देण्यात आले आहेत. तिचा मृत्यू हा तिला झालेल्या जखमांमुळे झाला आहे. तिच्यावर उपचार करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली पण तरीही तिचा मृत्यू झाला.
या मुलीची ओळख सांगण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, की या मुलीची ओळख गुप्त ठेवावी असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.
एलिझाबेथ रुग्णालयात तिच्यावर उपचार करणारे डॉक्टर लोह यांनी सांगितले, की भारतीय वेळेनुसार काल सायंकाळी साडेसहा वाजता तिची प्रकृती आणखी नाजूक बनली होती, तिचे बहुतांश अवयव काम करेनासे झाले होते. तरीही तिला कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले, सुयोग्य प्रमाणात प्रतिजैविके देण्यात आली होती.