दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील बालगुन्हेगाराच्या शिक्षेचा तीन वर्षांचा कालावधी संपुष्टात येण्यास जवळपास एक महिना उरला असून तो आपल्या मूळगावी परतण्याची शक्यता असल्याने यापुढे त्याच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी संतप्त गावकऱ्यांनी एक पथक स्थापन केले आहे. आपल्या मुलाने जे कृत्य केले त्याची शिक्षा त्याला झालीच पाहिजे, असे या बालगुन्हेगाराच्या आईचे म्हणणे असले तरी मुलाला पाहण्यासाठी ती उत्सुक आहे. या बालगुन्हेगाराच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्याची तयारी गावकऱ्यांनी केली आहे.
या बलात्कार प्रकरणातील बालगुन्हेगाराच्या कृत्यांमुळे बालगुन्हेगार कायदा २०००ची व्यापक छाननी करण्यात आली. यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने कायद्यात सुधारणा करून १६ ते १८ वर्षे वयोगटातील बालगुन्हेगारांना खून अथवा बलात्कारासारख्या गुन्ह्य़ांमध्ये प्रौढ गुन्हेगार म्हणून ग्राह्य़ धरण्याची सुधारणा केली. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने मंगळवारी केंद्र आणि दिल्ली सरकारवर नोटिसा बजावल्या आणि या बालगुन्हेगाराच्या सुटकेबाबतचा तपशील मागविला.
उत्तर प्रदेशातील बदाऊन गावातील प्रधान पुरुषोत्तमसिंह यांनी स्पष्ट केले की, या बालगुन्हेगाराचे वर्तन सुधारले तर आम्ही त्याच्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करू, मात्र त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले जाईल, असे प्रधान म्हणाले. सदर बालगुन्हेगार गावात परतत असल्याबद्दल काही गावकऱ्यांनी चिंता व्यक्त केली, त्याला अधिक कठोर शिक्षा व्हावयास हवी होती, त्याने आमच्या गावाच्या नावाला बट्टा लावला आहे. यापुढे आमचे गाव बलात्कार प्रकरणातील आरोपीचे गाव म्हणून देशात ओळखले जाईल, असेही त्यांचे म्हणणे आहे.
गावकऱ्यांच्या इतक्या तीव्र भावना असल्या तरी त्यांनी कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. या कुटुंबाची स्थिती आणि त्यांचे घर पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या घराच्या गच्चीचे काम करून बाजूची भिंतही उभारली. अर्दवट अवस्थेतील छत, पोपडे उडालेल्या भिंती हा सहा जणांच्या कुटुंबाचा निवारा आहे. त्याचे वडील मनोरुग्ण आहेत. केवळ १७ वर्षांची एक बहीण हीच पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत आहे. इतक्या वर्षांँनी तो येऊन आमच्यासमोर उभा राहिला तरी त्याला ओळखणे कठीण होणार आहे. सात वर्षांपूर्वी त्याने कुटुंबासाठी घर सोडले होते, असे पुरुषोत्तमसिंह यांनी सांगितले.

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील बालगुन्हेगाराच्या  वर्तनात सुधारणा झाली नाही तर संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्याची तयारी गावकऱ्यांनी केली आहे.